युरोपिय इंधनक्षेत्रात आणीबाणीची परिस्थिती

- हंगेरीकडून ‘एनर्जी इमर्जन्सी'ची घोषणा

इंधनक्षेत्रातबुडापेस्ट/बर्लिन – युरोपच्या इंधनक्षेत्रात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून त्याचे परिणाम हंगेरीवरही होत आहेत, असा इशारा देत हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी देशात ‘एनर्जी इमर्जन्सी’ची घोषणा केली. त्यानुसार, पुढील महिन्यापासून हंगेरी इंधनवायूची निर्यात पूर्णपणे बंद करणार असून कोळसा व अणुऊर्जेचे उत्पादन वाढविणार आहे. हंगेरी त्याच्या गरजेपैकी जवळपास 70 टक्के इंधन रशियाकडून आयात करतो. गेल्या काही दिवसात रशियाने युरोपचा इंधनपुरवठा घटविल्याने संबंधित देशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युरोपिय देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. युरोपिय महासंघाने या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून होणारी इंधनआयात मोठ्या प्रमाणात घटविण्याची घोषणाही केली आहे. या पार्श्वभूमीवर काही देशांनी रशियाकडून करण्यात येणारी आयात थांबविली आहे. तर नवे नियम न पाळल्याने रशियाने काही देशांचा इंधनपुरवठा बंद केला आहे. मात्र अजूनही युरोपातील अनेक आघाडीचे देश रशियन इंधनावर अवलंबून असून इंधनाची आयात सुरू आहे.

इंधनक्षेत्रातरशियाने या मुद्यावरील आपले धोरण अधिक आक्रमक करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून रशियाने युरोपातील आघाडीचा देश असणाऱ्या जर्मनीचा इंधनपुरवठा घटविला होता. त्याचवेळी फ्रान्स, इटली व ऑस्ट्रियातील कंपन्यांना होणारा इंधनपुरवठाही कमी करण्यात आला. काही दिवसांपूर्वी रशियाने युरोपिय देशांना इंधनवायुचा पुरवठा करणारी ‘नॉर्ड स्ट्रीम 1′ ही इंधनवाहिनी बंद करण्याची घोषणा केली. दुरुस्ती व देखभालीसाठी ही इंधनवाहिनी 10 दिवसांसाठी इंधनपुरवठा करणार नाही, असे रशियाकडून सांगण्यात आले.

रशियाकडून इंधनपुरवठ्यात सुरू असणारी घट युरोपिय देशांना अस्वस्थ करणारी ठरली आहे. त्यामुळे युरोपिय महासंघाने ‘इमर्जन्सी प्लॅन’ची तयारी सुरू केली असून पुढील आठवड्यात त्याची अधिकृत घोषणा होणार आहे. मात्र ही घोषणा होण्यापूर्वीच हंगेरीने ‘एनर्जी इमर्जन्सी’ची घोषणा करून युरोपसमोरील इंधनाचे संकट अधिक गंभीर होत असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही महिन्यात रशियाकडून सर्वाधिक इंधन आयात करणाऱ्या जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया यासारख्या देशांनी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या स्तरांवर ‘इमर्जन्सी प्लॅन’ सक्रिय करण्यासाठी पावले उचलली आहेत.

त्यात बंद पडलेले ऊर्जा प्रकल्प चालू करणे, कोळसा व कच्च्या तेलाचा वापर वाढविणे, उद्योगक्षेत्रावर इंधनाच्या वापराबाबत निर्बंध लादणे, ‘एनर्जी रेशनिंग’ यासारख्या उपायांचा समावेश आहे. बहुतांश देशांनी आपल्या नागरिकांनाही ऊर्जेचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. यामागे रशिया युरोपला होणारा इंधनपुरवठा पूर्णपणे थांबवण्याची भीती हे प्रमुख कारण आहे. रशियाने हंगेरीला होणारा इंधनपुरवठा थांबविला नसतानाही, या देशाने ‘एनर्जी इमर्जन्सी’ची घोषणा करण्यामागे हीच भीती असल्याचे सांगण्यात येते.

रशियावर निर्बंध टाकून युरोपने आत्मघात केला आहे – हंगेरीच्या पंतप्रधानांनी बजावले

बुडापेस्ट – रशियावर चुकीच्या पद्धतीने लादलेले निर्बंध म्हणजे युरोपने स्वतःच्या फुफ्फुसात गोळी मारुन घेण्याचा प्रकार आहे, अशी कडवट टीका हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी केली. जर रशियावर टाकलेले निर्बंध मागे घेतले नाहीत तर युरोपियन अर्थव्यवस्था नष्ट होईल, असेही ऑर्बन यांनी यावेळी बजावले.

‘सुरुवातीला युरोपने पायात गोळी झाडून घेतली, असे मला वाटले होते. पण युरोपियन अर्थव्यवस्थेने आपल्याच फुफ्फुसांवर गोळी चालविली आहे आणि आता हवा मिळविण्यासाठी ही अर्थव्यवस्था धडपडत आहे. रशियावर टाकलेल्या निर्बंधांनी युक्रेनला फायदा झालेला नाही पण युरोपियन अर्थव्यवस्थेची चांगलीच वाट लागली आहे. सध्या जे काही घडते आहे ते सहन करण्यापलिकडचे आहे’, असे पंतप्रधान ऑर्बन म्हणाले.

रशियावर टाकलेले निर्बंध चुकीच्या गृहितकांवर आधारलेले आहेत आणि आता हे मान्य करण्याची वेळ आली आहे, असा टोलाही ऑर्बन यांनी लगावला. युरोपिय महासंघाचा सदस्य असलेल्या हंगेरीने सातत्याने रशियन निर्बंधांना विरोध केला आहे. इंधनावर टाकण्यात आलेल्या निर्बंधांच्या मुद्यावरही हंगेरीने दडपण आणून सवलत मिळविण्यात यश मिळविले आहे.

leave a reply