सौदीने इस्रायलसह सर्व देशांच्या विमानांसाठी हवाईसीमा खुली केली

हवाईसीमारियाध/वॉशिंग्टन – यापुढे सौदी अरेबियाची हवाईसीमा प्रत्येक देशाच्या विमानांसाठी खुली असेल. यासाठी कुठल्याही देशावर निर्बंध नसतील, अशी लक्षवेधी घोषणा सौदीने केली. थेट उल्लेख टाळला असला तरी सौदीने इस्रायलसाठी आपली हवाई हद्द खुली करण्यासाठीच ही घोषणा केल्याचे दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या दौऱ्याआधी सौदीने ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे याचे श्रेय राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना जाते, असा दावा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी केला. दरम्यान, इराणवरील हवाई हल्ल्यासाठी सौदीने आपली हवाई हद्द इस्रायली लढाऊ विमानांसाठी मोकळी करण्याची तयारी दाखविल्याच्या बातम्या काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.

हवाईसीमासौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणने शुक्रवारी सर्व प्रकारच्या विमानांसाठी हवाई हद्द खुली केल्याचे जाहीर केले. सौदीच्या नियमांचे पालन करणाऱ्या विमानांच्या प्रवासावर कुठल्याही प्रकारची बंदी नसेल, असे सौदीच्या यंत्रणेने स्पष्ट केले. याआधी 2020 साली इस्रायल आणि युएईमध्ये अब्राहम करार झाल्यानंतर, पुढच्या काही आठवड्यातच सौदीने इस्रायली प्रवासी विमानांना युएईच्या प्रवासासाठी आपली हद्द मोकळी केली होती. पण आता सौदीने सर्व प्रकारच्या विमानांसाठी हवाईसीमा खुली करण्याचे जाहीर करून मोठा निर्णय घेतल्याचा दावा केला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. अरब देशांमधूनही सौदीच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

हवाईसीमागेल्या आठवड्यात इस्रायली लष्करी विश्लेषकांचे पथक सौदीला गेले होते. यावेळी आपले चांगले स्वागत झाल्याची माहिती इस्रायली लष्करी विश्लेषकांनी दिली होती. यानंतर सौदीने जाहीर केलेला हा निर्णय म्हणजे इस्रायलशी सहकार्यासाठी उचललेले आणखी एक पाऊल असल्याचे दिसते.

दरम्यान, इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायल व सौदी एकत्र येतील. इराणवर हल्ले चढविण्यासाठी सौदी इस्रायलच्या लढाऊ विमानांना आपल्या हवाईहद्दीचा वापर करू देईल, अशा बातम्या काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. इस्रायल व सौदीमध्ये छुप्या पातळीवरील सहकार्य याआधीच सुरू झालेले आहे. पण दोन्ही देशांनी हे सहकार्य उघड न करण्याची दक्षता घेतली होती, असे दावे करण्यात येत होते. पण आता अरब-आखाती देश अब्राहम करार करून इस्रायलला मान्यता देत आहेत. त्यामुळे सौदीला इस्रायलशी सहकार्य करण्यासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी तयार झाली आहे.

leave a reply