भारताच्या सहाय्याने नेपाळमध्ये ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’ची उभारणी

नवी दिल्ली – भारत नेपाळच्या सीमेनजीक नेपाळगंज येथे ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’ उभारण्याच्या कामाचा शुक्रवारी शुभारंभ झाला. भारताच्या खर्चाने नेपाळमध्ये ही ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’ उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमात भारताचे वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि नेपाळचे शहर विकासमंत्री कृष्ण गोपाळ व्हर्च्युअली सहभागी झाले होते. दोन्ही देशांचे संबंध पुन्हा पूर्ववत होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

'इंटिग्रेटेड चेक पोस्ट'

दोन्ही देशांमधील आयात-निर्यात, मालाची हाताळणी या ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’च्या माध्यमातून मध्ये केली जाणार आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी मालवाहतुकीचे नियंत्रण, कर व इतर व्यापार व्यवस्था अधिक मजबूत करणे हा ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’चा उद्देश आहे. भारत या ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’साठी १४७ कोटी रुपये खर्च करणार आहे. ६१.५ एकर वर ही सुविधा उभारली जात असून दोन वर्षात याचे काम पूर्ण होईल.

भारताच्या सीमेतही अशाच प्रकारच्या ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’चे काम सुरु झाले आहे. मे महिन्यात या कामाची सुरुवात झाली होती. भारतीय सीमेतील या व्यापारी चौकीचे काम १० टक्के पूर्णही झाले आहे. पण नेपाळमध्ये या चौकीच्या काम सुरु झाले नव्हते. नेपाळने भारतीय भूभागावर केलेला दावा आणि त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या राजकीय नकाशानंतर भारत नेपाळचे संबंध ताणले गेले होते.

नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांनी भारताच्या हिताला धक्का देणारे निर्णय घेतले होते. यातून हे संबंध अधिकच ताणले गेले. चीनबरोबर नेपाळची वाढविलेली जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय होती. मात्र आता नेपाळ पुन्हा भारताबरोबर जुळवून घेताना दिसत आहे. याचे संकेत नेपाळने गेल्या काही निर्णयातून दिले आहेत.

नुकताच भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चे प्रमुख सामंत गोयल आणि त्यानंतर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी नेपाळचा दौरा केला होता. यानंतर नेपाळचे सूर पूर्ण बदलल्याचे दिसत आहेत. दोन्ही देशांमध्ये परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चा पुन्हा सुरु होऊ शकते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला नेपाळ भेटीवर जाणार आहेत. त्याआधी ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’च्या कामाचा झालेला शुभारंभ लक्षवेधी ठरत आहे.

leave a reply