उत्तर प्रदेशमध्ये लष्करी भरतीतील गैरव्यवहारात ‘आयएसआय’चा हात असल्याचा संशय

- पाच जणांना अटक

लखनौ – मिलिटरी इंटेलिजन्स (एमआय) आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय लष्करात भरती करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात भारतीय लष्कराचा माजी जवान, दोन पोलिसांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात या टोळीने अनेक तरुणांना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय लष्करात भरती केले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ व अन्य देशविरोधी शक्तींनी या टोळीद्वारे आपल्या सदस्यांना सैन्यात भरती केल्याचा संशय आहे.

'आयएसआय'

उत्तर प्रदेश पोलिस व मिलिटरी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. या रॅकेटद्वारे भारतीय लष्करात भरती झालेल्या किमान २१ जणांचा शोध लागला असून इतरांची माहिती घेण्यात येत आहे. जानेवारी २०१९पासून उत्तर प्रदेशच्या बरेली, पिलभीत, बदाऊ आणि शाहजहानपूर जिल्ह्यातील सर्व यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय लष्करात भरती करून घेणे ही गंभीर बाब आहे. त्यासंदर्भात सर्व तथ्य तपासण्यात येईल. रॅकेट किती विस्तारले आहे हे शोधण्यासाठी या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात ‘आयबी’सह इतर सुरक्षा यंत्रणांनाही सामील करून घेण्यात येत आहे. या प्रकरणात सर्व यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे’, असे बरेलीचे डीआयजी राजेश पांडे यांनी सांगितले.

शाहजहानपूरमधील बांदा परिसरातील एका खोलीत अशा प्रकारचे रॅकेट चालते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २१ उमेदवारांची नावे व पत्ते हाती लागले. सरकारी कार्यालये व गाव प्रमुखांचे २३ बनावट शिक्केही जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत.

‘या रॅकेटच्या माध्यमातून भरती झालेल्या एकूण उमेदवारांची संख्या शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही बाब राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे.भारतीय लष्करातील भरती पूर्णपणे पारदर्शक आहे. पण प्रक्रियेत घोटाळा झाला असल्यास त्याची सखोल चौकशी केली जाईल’, अशी माहिती मिलिटरी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरेश सोम या लष्कराच्या माजी जवानाने भरती संदर्भातील गोपनीय माहिती बाहेर पुरवली असून, त्याचा वापर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा मिलिटरी इंटेलिजन्सकडून करण्यात आला आहे. रॅकेटचा फायदा उचलून बनावट कागदपत्रांद्वारे लष्करात सामील झालेल्यांची संख्या जास्त असू शकते, असे संकेतही मिलिटरी इंटेलिजन्सकडून देण्यात आले आहेत.

leave a reply