भारताने जिबौतीला ५० मेट्रिक टन अन्नधान्य सुपूर्द केले

अन्नधान्यनवी दिल्ली – बुधवारी भारताने जिबौतीकडे ५० मेट्रिक टन अन्नधान्य सुपूर्द केले. भारताच्या ‘मिशन सागर -२’ या मोहिमेअंतर्गत भारत नैसर्गिक आणि कोरोनाव्हायरसच्या संकटाचा जबर फटका बसलेल्या आफ्रिकन देशांना मानवतावादी सहाय्य पुरवित आहे. या मोहिमेअंतर्गत भारताने सुदान आणि इरिट्रिया या आफ्रिकन देशांना अन्नधान्यांचा पुरवठा केला आहे.

ऑक्टोबर महिन्यात ‘आयएनएस ऐरावत’ युद्धनौका अन्नधान्यांचा साठा घेऊन आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाली होती. सुदान, इरिट्रियानंतर आता जिबौतीमधील बंदरात हा अन्नधान्यांचा साठा घेऊन ‘आयएनएस ऐरावत’ दाखल झाली आहे. बुधवारी हे अन्नधान्य जिबौतीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिबौतीमधील भारताचे राजदूत अशोक कुमार आणि ‘आयएनएस ऐरावत’चे कमांडर प्रसन्न कुमार उपस्थित होते. यानंतर ‘आयएनएस ऐरावत’ केनियाच्या दिशेने रवाना होणार आहे.

अन्नधान्य

भारत ‘मिशन सागर -२’ अंतर्गत शेजारी देश, हिंदी महासागर क्षेत्रातील देशांसोबतचे सहकार्य वाढवित आहे. आफ्रिकन देशांना अन्नधान्याचा पुरवठा देखील त्याचाच एक भाग ठरतो. या माध्यमातून आफ्रिकन देशांना मदत तर पोहोचत आहे. याचबरोबर भारत आणि आफ्रिकन देशांच्या नौदलांमधील सहकार्यही यामुळे विस्तारात आहे. चीनचा आफ्रिकन देशांवरील प्रभाव वाढत असताना आणि ‘जिबौती’मध्ये चीनचा तळ असताना भारतीय नौदलाच्या युद्धनौकेची या क्षेत्रातील उपस्थिती विश्लेषकांचे लक्ष वेधून घेणारी ठरते.

दरम्यान , याआधी कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात भारताने ‘मिशन सागर’ अंतर्गत हिंदी महासागर क्षेत्रातील देशांना ५८० टन अन्नधान्य आणि वैद्यकीय सहाय्यांचा पुरवठा केला होता. त्यावेळी भारतीय नौदलाची ‘आयएनएस केसरी’ ही युद्धनौका हिंदी महासागरातल्या देशांच्या बेटांच्या दौऱ्यावर गेली होती.

leave a reply