नाटोचा सदस्य असलेल्या ‘माँटेनेग्रो’वर मोठे सायबरहल्ले

-रशियाचा हात असल्याचा आरोप

Montenegroमाँटेनेग्रो – नाटोचा सदस्य देश असणाऱ्या माँटेनेग्रोवर मोठा सायबरहल्ला झाल्याचे उघडकीस आले आहे. या हल्ल्यामुळे माँटेनेग्रो सरकारशी निगडित बहुतांश यंत्रणा ठप्प झाल्या असून हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा सायबरहल्ला असल्याचा दावा सूत्रांनी केला. सदर हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकी तपासयंत्रणा ‘एफबीआय’चे विशेष पथक माँटेनेग्रोमध्ये पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर युरोपिय देशांवर होणाऱ्या सायबरहल्ल्यांमध्ये वाढ झाली असून त्यामागे रशियाचा हात असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी इटली तसेच पोर्तुगालमधील नाटोशी संबंधित कॉम्प्युटर नेटवर्क्सना लक्ष्य केल्याचे समोर आले होते.

गेल्या महिन्यापासून माँटेनेग्रोवरील सायबरहल्ल्यांना सुरुवात झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. टप्प्याटप्प्याने सरकारी यंत्रणांवर हल्ले करण्यात आले. सलग तीन आठवडे सुरू राहिलेल्या हल्ल्यांमुळे माँटेनेग्रो सरकारचा भाग असलेल्या बहुतांश इंटरनेट सुविधा बंद पडल्या आहेत. ‘एफबीआय’च्या पथकासह इतर सायबरतज्ज्ञांनी सरकारला सर्व कॉम्प्युटर नेटवर्क्सचे प्लग काढून बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. माँटेनेग्रोचे संरक्षणमंत्री रॅस्को कोन्जेविक यांनी याला दुजोरा दिला. सरकार व प्रशासनाशी निगडित सर्व कॉम्प्युटर सिस्टिम्स बंद करण्यात आल्या असल्याचे कोन्जेविक यांनी सांगितले.

Major cyberattacksप्राथमिक तपासातून या हल्ल्यामागे रशियातील ‘क्युबा रॅन्समवेअर’ नावाची सायबरटोळी असल्याचे समोर आले आहे. या टोळीने सदर हल्ल्यासाठी विशेष व्हायरस तयार केल्याची माहितीही उघड झाली. रशियन गटाने सायबरहल्ल्याची जबाबदारी घेतली असून सदर हल्ल्याला ‘झीरोडेट’ असे नाव दिल्याचेही सांगितले. माँटेनेग्रोव्यतिरिक्त मोल्दोवा, स्लोव्हेनिया, नॉर्थ मॅसिडोनिआ या देशांवरही सायबरहल्ले झाल्याचे उघड झाले आहे.

माँटेनेग्रो हा २०१७ साली नाटोत सामील झाला असून या सदस्यत्वाला रशियाने जोरदार विरोध दर्शविला होता. मात्र त्यानंतरही माँटेनेग्रो नाटोचा सदस्य झाल्याने रशियाने या देशाला वारंवार इशारे दिले होते. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरही रशियाने युक्रेनला तसेच रशियावरील निर्बंधांना समर्थन देणाऱ्या देशांना लक्ष्य करण्याबाबत बजावले होते. माँटेनेग्रोवरील सायबरहल्ला त्याचाच भाग दिसत आहे.

leave a reply