भारतात गेल्या २४ तासात ७७ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली – भारतात गेल्या २४ तासात कोरोना साथीत एक हजार ५७ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारपासून शुक्रवारी सकाळपर्यंत देशात ७७ हजार २६६ नवीन कोरोना रुग्ण वाढले असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे. सलग दोन दिवसात देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला ७५ हजारांपेक्षा जास्त प्रमाणात वाढली आहे. देशातील कोरोना बळींची संख्याही ६१,५२९ वर पोहोचली आहे. सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात १४ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना रुग्ण

आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ७६.२८ टाक्यांवर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी गेल्या दोन दिवसात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात झालेली वाढ चिंता वाढवणारी ठरते. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाख ८७ हजार ५०१ वर पोहोचली आहे. २५ लाख ८३ हजार ९४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एक हजार ५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश व तामिळनाडू राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा प्रमाणात वाढ होत असल्याचे समोर येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ७ लाख ४७ हजार ९९५ वर पोहोचली आहे. राज्यात गेल्या २४ तासात १४ हजार ३६१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर ११ हजार ६०७ करोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख ८० हजार ७१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.६२ टाक्यांवर पोहोचले आहे.

केंद्र सरकारकडून कोविद व्यवस्थापनासाठी रुग्णालय सुविधांवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी सरकारने देशभरात तीन पातळ्यांवर व्यवस्थापन सुविधा सुरू केल्या आहेत. गंभीर रुग्णांसाठी आयसीयू खाटा आणि व्हेंटिलेटरसह कोविद समर्पित रुग्णालय, ऑक्सिजन बेड आणि ‘डॉक्टर ऑन कॉल’ सुविधा देण्यात आल्या आहेत. यासह कोविद आरोग्य केंद्र आणि अलगिकरण खाटांसह कोविद केअर केंद्रे सुरू आहेत. देशात सध्या १५, ८९,१०५ अलगीकरण खाटा, २,१७,१२८ ऑक्सिजन बेड, ५७,३८० आयसीयू बेडसह १७२३ कोविड समर्पित रुग्णालय, ३८८३ कोविद समर्पित आरोग्य केंद्र आणि ११,६८९ कोविद केअर केंद्र कार्यरत आहेत.

leave a reply