युरोपने आक्रमक अंतराळ धोरण तयार करण्याची गरज

- फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे आवाहन

अंतराळ धोरणपॅरिस – ‘अंतराळक्षेत्रावर योग्य नियंत्रण ठेवता आले नाही तर पूर्ण सत्ता अथवा स्वायत्तता कधीच मिळणार नाही. आपले स्रोत व संसाधने यावर ताबा ठेवण्यासाठी तसेच नव्या आघाड्यांवर यश मिळविण्यासाठी अंतराळक्षेत्रात नियंत्रण असणे महत्त्वाचे आहे’, असे सांगून युरोपने आक्रमक अंतराळ धोरण तयार करण्याची गरज आहे असे आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केले.

विज्ञान, तंत्रज्ञान व संरक्षणक्षेत्रातील स्पर्धेच्या दृष्टिकोनातून अंतराळक्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात जर युरोप प्रतिस्पर्धी देशांपेक्षा मागे पडला तर युरोपचे सार्वभौमत्त्व पणाला लागू शकते, असा इशाराही फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी दिला. गेल्या महिन्यात ‘युरोपियन स्पेस एजन्सी’च्या प्रमुखांनी नजिकच्या काळात युरोपने मानवी अंतराळमोहिमेसाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन केले होते. त्याकडे लक्ष वेधून मॅक्रॉन यांनी, युरोपने अंतराळक्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा निश्‍चित करायला हवी, अशी मागणी केली आहे.

मंगळावर जाणार्‍या अमेरिकेचे अनुकरण करणे किंवा स्वतंत्र अवकाशस्थानकासाठी प्रयत्न करणे यापैकी एक पर्याय निवडायला हवा, असेही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सुचविले आहे. युरोपला केवळ आघाडीच्या देशांशीच नाही तर अंतराळक्षेत्रातील बड्या खाजगी कंपन्यांशीही स्पर्धा करायची आहे, याची जाणीवही मॅक्रॉन यांनी करून दिली. युरोपातील खाजगी कंपन्या सरकारी निधी उपलब्ध करून देणे या पर्यायावरही विचार करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.

युरोपिय महासंघाने २००७ साली ‘स्पेस पॉलिसी’ जाहीर केली असली तरी त्यात उपग्रह प्रक्षेपण, ‘ग्लोबल पोझिशनिंग सर्व्हिस’ व संशोधन यावर अधिक भर देण्यात आला आहे. मात्र मानवी अंतराळमोहिम व अंतराळातील शस्त्रस्पर्धेच्या बाबतीत युरोप इतर देशांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी आक्रमक अंतराळ धोरणाची मागणी करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply