४५ दिवसात मंगळापर्यंतचा प्रवास शक्य होईल

- मॅक्गिल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा दावा

ओटावा – पृथ्वीवरून मंगळ ग्रहापर्यंतचा प्रवास ४५ दिवसात करणे शक्य आहे, असा दावा कॅनडाच्या मॅक्गिल युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केला आहे. सध्या या प्रवासासाठी जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र ‘लेझर थर्मल प्रॉपल्शन सिस्टिम’च्या सहाय्याने सदर प्रवास अवघ्या दीड महिन्यात शक्य होईल, असे कॅनडातील संशोधकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षात जगातील आघाडीच्या देशांसह एलॉन मस्कसारख्या प्रमुख उद्योजकांनी मंगळावर जाण्याच्या महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत. यात अमेरिका, चीन, युएईसह भारताचाही समावेश आहे. सध्या मंगळावर पाठविण्यात येणार्‍या अवकाशयानांसाठी ‘क्रायोजेनिक लिक्विड ऑक्सिजन’ तसेच सौरऊर्जेचा वापर करण्यात येतो. भविष्यात अणुऊर्जेचा वापर करून अंतराळयान विकसित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, कॅनडातील मॅक्गिल युनिव्हर्सिटीतील संशोधक इमॅन्युअल ड्युप्ले यांनी लेझरचा वापर असलेल्या ‘डायरेक्टेड एनर्जी प्रॉपल्शन’ची संकल्पना मांडली आहे. पृथ्वीवरून अवकाशातील अंतराळयानावर असलेल्या ‘फोटोव्होल्टिक ऍरेज’वर लेझरचा मारा करून ऊर्जानिर्मिती करायची व त्या जोरावर यानाला वेग द्यायचा अशी ड्युप्ले यांची योजना आहे. ‘लेझर थर्मल प्रॉपल्शन सिस्टिम’मुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेच्या जोरावर अंतराळयान सध्याच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करून मंगळानजिक पोहोचेल, असे कॅनेडियन संशोधकांनी म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी ‘ब्रेकथ्रू इनिशिएटिव्ह’ या गटाकडूनही १०० गिगावॅट क्षमतेच्या लेझरचा वापर करून अंतराळयान पाठविण्याची योजना मांडण्यात आली होती.

leave a reply