अमेरिका किंवा चीनपैकी एकाची निवड करण्यासाठी युरोपवर दबाव टाकणार नाही

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन

ब्रुसेल्स – ‘चीनचा विचार करता अमेरिका आपल्या सहकारी देशांवर आम्ही किंवा ते असा पर्याय निवडण्यासाठी दबाव टाकणार नाही. हवामानबदलासारख्या विविध मुद्यांवर ज्या ठिकाणी चीनशी सहकार्य शक्य असेल त्यावेळी इतर देशांनी जरुर सहकार्याची भूमिका घ्यावी’, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. ब्रुसेल्समध्ये नाटोच्या बैठकीदरम्यान ब्लिंकन यांनी युरोपिय देशांना निर्णय घेण्याची मोकळीक देतानाच चीन हा नाटोच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचा इशाराही दिला.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात आक्रमक मोहीम छेडतानाच, अमेरिकेच्या मित्रदेशांनीही या मुद्यावर साथ द्यावी अशी आग्रही भूमिका घेतली होती. ट्रम्प प्रशासनाने या मुद्यावर राबविलेल्या आक्रमक मोहीमेमुळे युरोपिय देशांसह नाटोनेही आपली चीनविषयक भूमिका बदलण्यास सुरुवात केली होती. गेल्या वर्षी नाटोने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, चीन हा सर्वात मोठा धोका असल्याचा स्पष्ट उल्लेखही करण्यात आला होता.

बुधवारी नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनीही, नाटो सदस्य देश व चीनची मूल्ये परस्परांशी जुळणारी नाहीत, असा इशारा दिला. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नाटोतील सहकारी देशांना निर्णय घेण्याची मोकळीक देणे लक्ष वेधून घेणारे ठरते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर, चीन हा अमेरिकेचा आघाडीचा स्पर्धक असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याचवेळी ट्रम्प प्रशासनाने चीनविरोधात घेतलेले काही आक्रमक निर्णय बदलले होते. चीनच्या कारवायांविरोधात बायडेन प्रशासनाकडून घेण्यात येणारी भूमिकाही ट्रम्प प्रशासनाच्या तुलनेत सौम्य असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी नाटो बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर केलेली वक्तव्येही त्याला दुजोरा देणारी दिसतात. ब्लिंकन यांनी चीन आंतरराष्ट्रीय व्यवस्था उद्ध्वस्त करीत असून, नाटोने एकत्र येऊन त्याला तोंड दिल्यास चीनला मागे टाकता येईल, असे आवाहन केले होते. मात्र त्यानंतर आपल्या मित्रदेशांना चीनच्या मुद्यावर निर्णय घेण्याची मोकळीक देऊन बायडेन प्रशासन चीनच्या मुद्यावर आक्रमक कारवाई करण्यास फारसा उत्सुक नसल्याचे दाखवून दिले.

दरम्यान, नाटोची बैठक सुरू असतानाच चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगहे बुधवारी युरोपिय देशांच्या दौर्‍यावर दाखल झाल्याचे समोर आले आहे. फेंगहे युरोपमधील ग्रीस, हंगेरी, सर्बिया व नॉर्थ मॅसिडोनियाला भेट देणार आहेत.

leave a reply