महाराष्ट्रात नाईट कर्फ्युची घोषणा

- चोवीस तासात ३७ हजार नवे रुग्ण आढळले

मुंबई – शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनामुळे ११२ जणांचा बळी गेला, तसेच सुमारे ३७ हजार नवे रुग्ण आढळले. राज्यात कोरोनाची साथ आटोक्यात येण्याची कोणतीही लक्षणे दिसत नसून यामुळे चिंता सतत वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी राज्यात सर्वत्र नाईट कर्फ्युची घोषणा केली. तसेच मॉल रात्री आठनंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करताना तसे झाले नाही, तर अधिक कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. देशात गुरुवारपासून शुक्रवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात ५९ हजार नवे रुग्ण आढळले होते. यातील ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रातील होते. केंद्र सरकार महाराष्ट्रात वाढत असलेल्या रुग्ण संख्येबाबत वारंवार चिंता व्यक्त करीत असून शुक्रवारीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग दुप्पट करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी महाराष्ट्रात अधिक कोरोना लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या साथीच्या बाबतीत दिवसेंदिवस स्थिती बिकट बनत चालली आहे. शुक्रवारी एका दिवसात राज्यात ३६,९०२ नव्या रुग्णांची नोंेंद झाली. तसेच यासाठी ११२ जणांचा बळी गेला. यातील ५५१३ नवे रुग्ण मुंबईत आढळले आहेत. तसेच ९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, उल्हासनगर, पालघर, भाईंदर, मीरा रोड, कल्याण-डोंबिवली या सर्व परिसरात एकूण ९९१५ नव्या रुग्ण आढळले आहेत.

पुणे मंडळात ८२८२ नव्या रुग्णांची नांेंद झाली आहे. नाशिक मंडळात ६२०९ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. तर नागपूर मंडळात ५०१९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातील नागपूरमध्ये जिल्ह्यातच चोवीस तासात ४ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल असून ३५ जणांचा बळी गेला. हा नागपूर जिल्ह्यातील एका दिवसातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

आपल्याला लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही. मात्र दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होत आहे. राज्यभरात कोरोनाच्या आरोग्य सुविधा अपुर्‍या पडतील अशी स्थिती निर्माण होत आहे. कोरोनाचे संकट गेलेले नाही, तर ते अधिक भीषण झाले आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे आणि सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच राज्यभरात रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली.

leave a reply