ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून येमेनमध्ये सैन्यतैनातीचे संकेत

लंडन – गेल्या सहा वर्षांपासून येमेनमध्ये सुरू असलेले गृहयुद्ध संपविण्यासाठी सौदी अरेबियाने दिलेल्या संघर्षबंदीच्या प्रस्तावाचे ब्रिटनने स्वागत केले. या प्रस्तावानुसार येमेनमधील सर्व गट या संघर्षबंदीत सहभागी झाले तर, ब्रिटनदेखील येमेनमधील शांती व स्थैर्यासाठी आपले सैन्य रवाना करील, अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली. दोन दिवसांपूर्वी ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीच्या नेत्यांमध्ये येमेनमधील संघर्षबंदीवर चर्चा पार पडली होती.

सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी येमेनमधील सौदीसमर्थक आघाडी सरकार व हौथी बंडखोरांना संघर्षबंदीचा प्रस्ताव दिला होता. संपूर्ण येमेनमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार थांबवून संघर्षबंदी लागू करावी, असे आवाहन सौदीने केले होते. जगभरातून सौदीच्या या प्रस्तावाचे स्वागत करण्यात आले होते.

यामुळे गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध संपुष्टात येऊन येमेनच्या जनतेसाठी सहाय्य सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी देखील सौदीच्या या प्रस्तावाला समर्थन दिले होते.

ब्रिटनच्या संसदेत यावर बोलताना पंतप्रधान जॉन्सन यांनी संघर्षबंदीसाठी सौदीने घेतलेल्या पुढाकाराचे कौतूक केले. सौदीच्या या प्रस्तावामुळे येमेनमधील परिस्थितीवर राजकीय तोडगा निघण्याची शक्यता वाढल्याचे पंतप्रधान जॉन्सन म्हणाले. त्याचबरोबर येमेनमधील गटांनी संघर्षबंदीचे पालन केले तर या देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटन आपले जवान रवाना करील.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीमोहिमेअंतर्गत हे पाऊल उचलले जाईल, अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिली. पण यासाठी येमेनमधील परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता असल्याचेही जॉन्सन यांनी स्पष्ट केले.

सौदीने येमेनमधील हौथींना संघर्षबंदीचे आवाहन केल्यानंतर ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीच्या नेत्यांमध्ये चर्चा पार पडली होती. येमेनमध्ये शांतीसैनिक तैनात करण्याच्या मुद्यावर या तीनही युरोपिय देशांमध्ये चर्चा पार पडल्याचा दावा केला जातो. पण याबाबत अधिकृत माहिती उघड झालेली नाही. अमेरिकेने देखील आखातासाठीचे आपले विशेषदूत टिम लेंडरकिंग यांना अरब देशांच्या दौर्‍यासाठी रवाना केले आहेत. इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी सौदीचा प्रस्ताव स्वीकारून संघर्षबंदीत सहभागी व्हावे, असे आवाहन विशेषदूत लेंडरकिंग करणार असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिली.

पाच दिवसांपूर्वी सौदीने दिलेला संघर्षबंदीचा प्रस्ताव हौथींनी धुडकावला आहे. सौदीच्या या प्रस्तावात नवे काहीच नसल्याची टीका हौथी तसेच इराणने केली आहे. यानंतर हौथींनी सौदीच्या इंधनप्रकल्प, इंधनतळ तसेच लष्करी व नागरी ठिकाणांवरील ड्रोन हल्ले वाढविले आहेत. हौथींच्या या हल्ल्यानंतरही सौदीने संयमी भूमिका स्वीकारली आहे. सौदीच्या यामुळे येमेनमध्ये संघर्षबंदी लागू करण्यासाठी हौथी बंडखोरांवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढू शकतो.

leave a reply