युरोपने तैवानच्या वादात कुणाचीही बाजू घेऊ नये

- फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा सल्ला

पॅरिस – तैवानचा वाद हा काही युरोपचा मुद्दा नाही. त्यामुळे युरोपने या वादात पडू नये, यात आपण सहभागी झालो तर युरोपला मोठा धोका संभवतो. त्यामुळे युरोपिय देशांनी आपल्या धोरणात्मक स्वायत्तेचा वापर करून तैवानप्रकरणी अमेरिका किंवा चीन यापैकी कुणाचीही बाजू घेऊ नये, असा सल्ला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी दिला. तीन दिवसांच्या चीन दौऱ्यानंतर मायदेशी परतलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी स्थानिक वर्तमानपत्राशी बोलताना युरोपने तैवानबाबत निष्पक्ष रहावे, असे सुचविले.

युरोपने तैवानच्या वादात कुणाचीही बाजू घेऊ नये - फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा सल्ला‘तैवानच्या संकटात सहभागी होणे, हे खरच आपल्या भल्याचे आहे का? असा प्रश्न युरोपिय देशांनी स्वत:ला विचारण्याची गरज आहे. अजिबात नाही! उलट याप्रकरणी अमेरिकेच्या अजेंड्याचे अनुकरण केले तर ते युरोपिय देशांसाठी घातक ठरेल आणि चीनकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येईल’, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले.

युरोपने अमेरिकेचा अजेंडा राबविण्याची आवश्यकता नाही, असे सांगत असताना राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी तैवानमधील स्थैर्याचा मुद्दाही उपस्थित केला. ‘तैवानच्या आखातातील स्थैर्य सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. त्यामुळे लष्करी बळाचा वापर करुन या क्षेत्राची यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही’, अशा शब्दात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनलाही लक्ष्य केले. ‘अजून आपण युक्रेनचाच प्रश्न सोडवू शकलेलो नाही, तर तैवानचा कसा सोडवू शकतो’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी युरोपिय देशांचे लक्ष युक्रेनकडे वळविले.

याआधीही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनच्या संघर्षाबाबत युक्रेन व अमेरिकेला दुखावणारी विधाने केली होती. हे युद्ध रोखण्यासाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेऊन अनेकवार चर्चा केली होती. त्याचबरोबर रशियाबरोबरच्या इंधन सहकार्याबाबतही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतंत्र भूमिका स्वीकारण्याचे संकेत दिले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन रशियाबरोबरच्या चर्चेला विरोध करीत असताना राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी रशियाबरोबर चर्चा शक्य असल्याचे दावे केले होते.

दरम्यान, अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर मार्को रुबियो यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वीकारलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेने देखील युक्रेनच्या संकटात युरोपिय महासंघाची साथ सोडली तर चालेल का, असा सवाल करून रुबियो यांनी मॅक्रॉन यांचा तर्क घातक असल्याचे बजावले आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष यांच्यासारखीच युरोपचीही भूमिका असेल, तर अमेरिकेनेही पुढच्या काळात कुणाचीही बाजू घेऊ नये. केवळ तैवानला संभवणाऱ्या धोक्याकडेच अमेरिकेने लक्ष पुरवायला हवे, असे सांगून युक्रेनची समस्या युरोपनेच हाताळावी, असा टोला रुबिओ यांनी लगावला आहे.

हिंदी English

 

leave a reply