उत्तर कोरियाला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका, दक्षिण कोरियाकडून आठ क्षेपणास्त्रांची चाचणी

us korea missilesसेऊल – उत्तर कोरियाने रविवारी लघु पल्ल्याच्या आठ क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन या क्षेत्रात तणाव निर्माण केला होता. उत्तर कोरियाच्या या चिथावणीखोर कारवाईला अमेरिका व दक्षिण कोरियाने त्याच भाषेत उत्तर दिले. सोमवारी अमेरिका आणि दक्षिण कोरियाने आठ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. त्याचबरोबर उत्तर कोरियाने या क्षेत्रातील तणाव वाढवू नये, असे आवाहन अमेरिका व दक्षिण कोरियन लष्कराने संयुक्त निवेदनाद्वारे केले.

येत्या काही दिवसात उत्तर कोरिया अणुचाचणी करणार असल्याचा इशारा अमेरिका व दक्षिण कोरियाच्या यंत्रणांनी दिला आहे. उत्तर कोरियाने ही चाचणी घेतली तर आधीच निर्बंधांखाली असलेल्या या देशावर नवे निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेने दिला होता. पण अमेरिकेच्या या निर्बंधांची अजिबात पर्वा न करता उत्तर कोरियाने रविवारी आठ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. ‘सी ऑफ जपान’च्या दिशेने सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्रांचा पल्ला 110 ते 670 किलोमीटर इतका होता.

us korea missile testगेल्या पाच महिन्यांमध्ये उत्तर कोरियाने 17 वेळा क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत. पण एकाच दिवसात आठ क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याची उत्तर कोरियाची ही पहिलीच वेळ ठरली. रविवारी केलेल्या चाचण्या म्हणजे उत्तर कोरियाकडून घेण्यात येणाऱ्या अणुचाचणीची पूर्वतयारी असू शकते, असा दावा काही विश्लेषकांनी केला होता. तर गेल्या आठवड्यात अमेरिका व दक्षिण कोरियन लष्कराने आयोजित केलेल्या युद्धसरावाला इशारा देण्यासाठी उत्तर कोरियाने ही चाचणी घेतल्याची शक्यताही काही विश्लेषकांनी वर्तविली होती.

उत्तर कोरियाच्या या चिथावणीला अमेरिका व जपानने लष्करी माध्यमातून प्रत्युत्तर दिले. चाचण्यांनंतर काही तासातच दोन्ही देशांनी ‘जॉईंट बॅलेस्टिक मिसाईल एक्सरसाईज’चे आयोजन केले. तर सोमवारी सकाळी अवघ्या दहा मिनिटांच्या फरकाने अमेरिका आणि दक्षिण कोरियाने आठ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. ‘आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टिम्स’ (एटीएसीएम) प्रकारातील ही क्षेपणास्त्रे असल्याचे दोन्ही देशांच्या लष्कराने प्रसिद्ध केले.

दरम्यान, गेल्या वर्षभरात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणीचा धडाका लावला आहे. पण आत्तापर्यंत अमेरिका व दक्षिण कोरियाने अशाप्रकारे उत्तर कोरियाला प्रत्युत्तर दिले नव्हते. दक्षिण कोरियात झालेल्या सत्ताबदलानंतर उत्तर कोरियाला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर मिळाल्याचे स्थानिक वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे.

leave a reply