इंधनाच्या टंचाईमुळे युरोपियन एकजुटीच्या चिंधड्या उडतील

- ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’च्या प्रमुखांचा इशारा

इंधनाच्या टंचाईमुळेपॅरिस – हिवाळ्यात इंधनाच्या टंचाईमुळे युरोपिय देशांमध्ये घेण्यात येणारे निर्णय युरोपिय महासंघातील एकजुटीच्या चिंधड्या उडवू शकतात, असा इशारा ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’चे (आयईए) प्रमुख फातिह बिरॉल यांनी दिला. इंधन टंचाईमुळे युरोपिय देश व्यापारावर निर्बंध टाकणे किंवा शेजारी देशांशी सहकार्य रोखणे यासारखे निर्णय घेऊ शकतात, असे बिरॉल यांनी बजावले. आयईएच्या प्रमुखांनी याची तुलना सोन्यासाठी अमेरिकेतील टोळ्यांमध्ये होणाऱ्या संघर्षाशी (वाईल्ड वेस्ट) केली. या इशाऱ्यामुळे रशियाला हादरा देण्याचे मनसुबे आखणाऱ्या युरोपिय महासंघाला इंधनसंकटाबरोबरच राजकीय आव्हानांच्या संकटाचाही सामना करावा लागेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

‘ग्लोबल क्लीन एनर्जी ॲक्शन फोरम’मध्ये दिलेल्या मुलाखतीत आयईएच्या प्रमुखांनी युरोपला नजिकच्या काळात संकटांच्या मालिकेला सामोरे जावे लागेल, असे बजावले. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपिय महासंघाने रशियन इंधनावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे युरोपातील इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे. ‘इंधनदरांमधीोल भडक्यामुळे युरोप आज मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. मंदीच्या संकटाला तोंड देण्यासाठी काही देश रशियाशी इंधनपुरवठ्याबाबत स्वतंत्र करार करण्याची भूमिका घेऊ शकतात. तर काही देशांकडून शेजारी देशांना पुरविण्यात येणाऱ्या इंधनाच्या निर्यातीवर निर्बंध लादले जाऊ शकतात’, याकडे बिरॉल यांनी लक्ष वेधले.

महासंघातील देशांनी जर फक्त आपल्यापुरता विचार करण्याची भूमिका घेतली तर युरोपिय देशांमधील ऐक्याला तडा जाईल व आंतरराष्ट्रीय पातळीवरील युरोपच्या प्रतिमेवर गंभीर परिणाम होतील, असा इशारा आयईएच्या प्रमुखांनी दिला. इंधनाचे साठे पुरेसे भरल्यानंतर युरोपिय देशांनी दाखविलेल्या आत्मसंतुष्ट वृत्तीवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. इंधनाचे साठे आता भरले असले तरी पुढील काळात युरोपला आर्थिक मंदी व ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’सारखी संकटे टाळता येणार नाहीत, असे बिरॉल यांनी बजावले. इंधन बाजारपेठेतील पुरवठा अद्यापही सुरळीत झाला नसून नैसर्गिक इंधनवायूसाठी आशियाई देशांची मागणीही वाढते आहे. त्यामुळे युरोपला 2023 मध्येही इंधनाच्या संकटाला तोंड द्यावे लागेल, याची जाणीव आयईएच्या प्रमुखांनी यावेळी करून दिली.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या युरोपिय देशांनी रशियाकडून इंधन आयात कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियन इंधनाची आयात 80 टक्क्यांपर्यंत घटविण्यात येणार आहे. मात्र रशियन इंधन बंद झाल्यानंतर त्याला सक्षम पर्याय शोधण्यात युरोपिय देश अपयशी ठरले आहेत. कच्चे तेल तसेच नैसर्गिक इंधनवायूची आयात वाढविण्यासाठी युरोपिय देशांनी आखाती देश तसेच आफ्रिका खंडातील देशांबरोबर चर्चा सुरू केली होती. मात्र या देशांनी आपण रशियाला पर्याय देऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्याचवेळी अमेरिकेतील इंधन उत्पादकांनीही हात वर केले असून आपण युरोपची गरज भागवू शकत नसल्याची कबुली नुकतीच दिली होती.

रशिया हा युरोपचा सर्वात मोठा इंधन निर्यातदार म्हणून ओळखण्यात येतो. युरोपिय इंधनाच्या एकूण गरजांपैकी 30 टक्क्यांहून अधिक गरज रशियाकडून पूर्ण करण्यात येते. सध्याच्या आकडेवारीनुसार युरोपिय देश रशियाकडून दररोज 35 लाख बॅरल्स कच्चे तेल व पेट्रोलियम उत्पादन आयात करतात. तर 2021 साली रशियाने युरोपिय देशांना 150 अब्ज घनमीटरहून अधिक नैसर्गिक इंधनवायू निर्यात केला होता.

तेल व इंधनवायूतील गुंतवणूक बंद करणे म्हणजे अमेरिकेसाठी नरकाचा मार्ग – जेपी मॉर्गनचे प्रमुखी जेमी डिमॉन

इंधनाच्या टंचाईमुळेवॉशिंग्टन – अमेरिकेतील आघाडीची वित्तसंस्था ‘जेपी मॉर्गन चेस’ कच्चे तेल व इंधनवायू क्षेत्रातील गुंतवणूक बंद करणार नाही. असे केल्यास तो अमेरिकेसाठी नरकाचा मार्ग ठरेल, असा खरमरीत इशारा जेपी मॉर्गनचे प्रमुख जेमी डिमॉन यांनी दिला. अमेरिकेच्या संसदेत नुकतीच वित्तसंस्थांच्या प्रमुखांची सुनावणी घेण्यात आली. यात अमेरिकेच्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्य रशिदा तलेब यांनी डिमॉन यांना तेल व इंधनवायूतील गुंतवणुकीसंदर्भात सवाल केला. अमेरिकेतील सहा आघाडीच्या वित्तसंस्थांनी या क्षेत्रातील गुंतवणूक बंद करण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवण तलेब यांनी करून दिली.

पण डिमॉन यांनी गुंतवणूक तसेच अर्थसहाय्य देण्याचे बंद करण्यास नकार दिला. त्यांच्याबरोबरच इतर तीन वित्तसंस्थांनीही तेल व इंधनवायू क्षेत्राचे अर्थसहाय्य बंद करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच जगातील आघाडीची इंधनकंपनी ‘ॲराम्को’च्या प्रमुखांनी सध्याच्या इंधन व ऊर्जा संकटामागे या क्षेत्रावर लादलेले कर आणि घटलेली गुंतवणूक हे घटक कारणीभूत असल्याचे बजावले होते.

 

leave a reply