चीनमधील अफवांमुळे जगभरात खळबळ

अफवाबीजिंग – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सध्या नजरकैदेत असून चीनची सत्तासूत्रे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ व माजी पंतप्रधान वेन जियबाओ हलवित असल्याची अफवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरली आहे. चिनी सोशल मीडियावरील चर्चा या अफवांना अधिकच बळ देत असून सध्या राजधानी बीजिंगच्या दिशेने जाणारे हायवे चिनी लष्कराने ब्लॉक करून टाकल्याचे दावे समोर येत आहेत. बंद दाराआड चीनमध्ये सत्ताबदलाची प्रक्रिया सुरू असून यात चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) वरिष्ठ अधिकारी जनरल ली किओमिंग आघाडीवर असून जिनपिंग यांनी कारवाई केलेले लष्करी अधिकारी सध्या पीएलएच्या बैठकांमध्ये सहभागी झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र सध्यातरी या दाव्यांचे बातम्यांमध्ये रूपांतर झालेले नसून त्याकडे अफवा म्हणूनच पाहिले जाते. तरीही चीनच्या पोलादी पडद्याआडून येणाऱ्या या अफवांचा वेग चक्रावून टाकणारा असून त्याला पार्श्वभूमी आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही.

चिनी वंशाचे अमेरिकन विश्लेषक गॉर्डन चँग यांनी चीनमधून केले जाणारे हे बंडाचे दावे म्हणजे सध्य तरी अफवाच असल्याचे स्पष्ट केले. तरीही त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, कारण गेल्या तीन दिवसात चिनी लष्करामध्ये सुरू असलेल्या अतिशय वेगळ्या हालचाली या देशाच्या नेतृत्त्वामध्ये अस्वस्थता माजल्याचे संकेत देत आहेत, असे गॉर्डन चँग यांनी म्हटले आहे. या लष्करी हालचालींचे व्हिडिओज्‌‍ देखील चँग यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चीनच्या हालचालींची सखोल माहिती असलेला व चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या पतनाचे भाकित वर्तविणारा डोळस विश्लेषक म्हणून गॉर्डन चँग ख्यातनाम आहेत. त्यांनी नोंदविलेले हे निरिक्षण जगभरातील विश्लेषकांना विचार करण्यास भाग पाडणारे ठरते.

कोरोनाची साथ व त्यानंतरच्याही काळात चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आपला देश सोडून दुसऱ्या कुठल्याही देशाच्या दौऱ्यावर गेले नव्हते. इतकेच नाही तर चीनमधील त्यांचा वावर देखील मर्यादितच होता. यामागे सत्ताबदलाच्या कटाचा संशय असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून वर्तविली जात होती. मात्र त्यावेळी त्याला दुजोरा मिळू शकला नाही. चीनमध्ये राज्यक्रांती घडविणारे नेते माओ त्से तुंग यांच्यानंतर सर्वाधिकार हाती एकवटलेले एकमेव नेते अशी शी जिनपिंग यांची ओळख बनली होती. या अमर्याद अधिकारांचा वापर करून जिनपिंग यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्याचा सपाटा लावला होता. तसेच पीएलएच्या अधिकारपदांवर त्यांनी आपल्या विश्वासपात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचेही सत्र सुरू केले होते.

याविरोधात चीनमध्ये अस्वस्थता पसरली असून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिटब्युरोमधूनच यावर कधीतरी जहाल प्रतिक्रिया येईल, असे दावे करण्यात येत होते. पण बराच काळ जिनपिंग आपल्या विरोधातील असंतोष दडपून ठेवण्यात यशस्वी ठरले. मात्र कोरोनाच्या साथीनंतर त्यांनी स्वीकारलेली झिरो कोव्हिड पॉलिसी अर्थात कोरोनाची साथ पसरू नये, यासाठी कडक कर्फ्यू लादण्याच्या धोरणांवर जनतेमध्ये असंतोष खदखदू लागला. याचाही परिणाम जिनपिंग यांच्या नेतृत्त्वावर झाला व त्यातच चीनची अर्थव्यवस्था घसरणीला लागल्याने, जिनपिंग यांची चीनच्या कम्युनिस्ट पक्षावरील पकड कमी झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. याच कारणामुळे जिनपिंग चीन सोडून दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर गेले नव्हते, कारण देशाबाहेर गेल्यानंतर सत्तेवरील आपली पकड सुटेल आणि घात होईल, अशी चिंता त्यांना वाटत असल्याचे दावे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते.

मात्र उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये पार पडलेल्या एससीओच्या बैठकीत अनुपस्थित राहणे जिनपिंग यांच्यासाठी अवघड गेले. इथून मायदेशी परतल्यानंतर जिनपिंग यांना वाटत असलेली भीती प्रत्यक्षात उतरल्याच्या अफवा समोर येत आहेत, त्याला ही सारी पार्श्वभूमी लाभलेली आहे. गेल्या दोन दिवसात बीजिंगच्या विमानतळावरून सहा हजार देशी व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती चिनी सोशल मीडियावरून दिली जात आहे. तर चीनची रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत खंडीत झाल्याची माहिती सोशल मीडियावर आलेली आहे. बीजिंगला जाणारे महामार्ग चिनी लष्कराने ताब्यात घेतल्याचे दावे करून तसे व्हिडिओज्‌‍ देखील प्रसिद्ध करण्यात येत आहेत. अमेरिकास्थित चिनी मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या जियांग झेन यांनी हे व्हिडिओज्‌‍ प्रसिद्ध केले आहेत.

21 सप्टेंबर रोजी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांची तातडीने भेट घेतली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार व अमेरिका सोव्हिएत रशियाबरोबरील शीतयुद्ध जिंकून देणारे मुत्सद्दी अशी किसिंजर यांची ओळख आहे. त्यांनीच अमेरिका व चीनमध्ये सहकार्य प्रस्थापित करून सोव्हिएत रशियाची कोंडी केली होती. चीनवर अधिराज्य गाजवणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाचे नियंत्रण करणाऱ्या पॉलिट ब्युरोमधील वरिष्ठ सदस्यांचे किसिंजर यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई आणि किसिंजर यांच्या 21 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या भेटीकडे संशयाने पाहिले जात आहे. तसेच रशियाला देखील चीनमध्ये सुरू असलेल्या या उलथापालथींची माहिती असल्याचे संकेत मिळत आहेत.

रशियाची राष्ट्रीय इंधन कंपनी गाझप्रोमने चीनचा इंधनपुरवठा रोखल्याचे दावे केले जातात. जिनपिंग यांना पाठिंबा देण्यासाठीच रशियाने हा निर्णय घेतल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे. पण रशियाने मात्र नेहमीच्या देखभालीसाठी हा इंधनपुरवठा थांबविण्यात आल्याची माहिती दिली आहे.

leave a reply