ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर युरोचे मूल्य दोन दशकांमधील नीचांकी पातळीवर

-मंदीची शक्यता वाढल्याचा विश्लेषकांचा दावा

energy-crisisब्रुसेल्स – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपातील ऊर्जा संकट अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. याचा फटका युरो चलनालाही बसला असून मंगळवारी युरो अमेरिकी डॉलरच्या तुलनेत दोन दशकांमधील नीचांकी पातळीवर घसरला. पुढील काळात युरोचे मूल्य अधिक घसरू शकते, असे भाकित अमेरिकी वित्तसंस्था ‘सिटीबँक’ने वर्तविले आहे. ऊर्जा संकटासह युरोची नवी घसरण युरोपमधील मंदीची शक्यता अधिक वाढल्याचे संकेत देत असल्याचा दावा विश्लेषकांनी केला.

Energy-Crisis-1मंगळवारी झालेल्या व्यवहारांमध्ये युरोचे मूल्य एक टक्क्याने घसरून ०.९९०५ डॉलर्सपर्यंत खाली आले. ही २००२ सालानंतरची सर्वात नीचांकी पातळी ठरली आहे. युरोच्या या घसरणीमागे रशिया-युक्रेन युद्ध, ऊर्जा संकट, महागाईचा भडका, चीनच्या अर्थव्यवस्थेला बसलेले धक्के व अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने केलेली दरवाढ यासारखे घटक कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. युरोपाठोपाठ ब्रिटीश पौंड व चीनच्या युआनच्या मूल्यातही घसरण झाली आहे.

रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनचे समर्थन करणाऱ्या युरोपिय देशांनी रशियावर जबर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांचा फटका युरोपियन देशांना बसण्यास सुरुवात झाली आहे. युरोपात महागाईचा विक्रमी भडका उडाला आहे. इंधन व वीजेच्या दरांमध्ये वर्षभरात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. त्याचवेळी युरोपचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असणाऱ्या चीनच्या अर्थव्यवस्थेला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. त्याचे मोठे परिणाम युरोपिय देशांवर दिसून येत आहेत.

Euro-valueयुरोपातील प्रमुख अर्थव्यवस्था असणाऱ्या जर्मनी, फ्रान्स व इटलीसारख्या देशांची निर्यात घसरली आहे. गेले दोन महिने युरोपातील उत्पादन क्षेत्रातही घसरण होत असून या क्षेत्राचा निर्देशांक फेब्रुवारी २०२१नंतरच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेने महागाईचा मुकाबला करण्यासाठी व्याजदरात जवळपास दोन टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे अमेरिकी डॉलरमधील गुंतवणूक अधिक वाढली असून त्याचा फटका युरो चलनाला बसला आहे. पुढील काळात युरो अमेरिकी डॉलरच्या तुलनेत अधिक घसरेल, असे भाकित अमेरिकी वित्तसंस्थेने वर्तविले आहे.

ऊर्जा संकटाची वाढती व्याप्ती, महागाईचा भडका, उत्पादन व निर्यातीला बसलेला फटका व आता युरो चलनात झालेली घसरण हे घटक युरोपिय महासंघाची अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची शक्यता वाढल्याचे संकेत देणारे आहेत, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात आला आहे. जर्मनीच्या मध्यवर्ती बँकेनेही याला दुजोरा दिला असून जर्मन अर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर असल्याचे म्हटले आहे.

leave a reply