अमेरिका, दक्षिण कोरियातील युद्धसरावामुळे चीन अस्वस्थ

युद्धसरावामुळे चीनसेऊल – तब्बल पाच वर्षांच्या पोकळीनंतर अमेरिका आणि दक्षिण कोरियन लष्कराचा सर्वात मोठा युद्धसराव सुरू झाला आहे. उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा संयुक्त सराव आयोजित केल्याचे दक्षिण कोरियन अधिकाऱ्यांनी सांगितले. पण या युद्धसरावामुळे चीन कमालीचा अस्वस्थ झाला आहे. या युद्धसरावाद्वारे अमेरिका या क्षेत्रातील आपल्या सज्जतेचे प्रदर्शन करीत असून या युद्धसरावामुळे या क्षेत्रात अस्थैर्य निर्माण होईल, असा आरोप चीनच्या मुखपत्राने केला.

सोमवारपासून अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करात ‘उल्ची फ्रिडम शिल्ड’ युद्धसराव सुरू झाला. १ सप्टेंबरपर्यंत चालणारा हा अमेरिका व दक्षिण कोरियन लष्करातील सर्वात मोठा युद्धसराव असल्याचा दावा केला जातो. यामध्ये उभय देशांची लढाऊ विमाने, युद्धनौका, विनाशिका, तोफा आणि हजारो जवान देखील सहभागी होतील. दोन टप्प्यांमध्ये हा सराव केला जाईल. पहिल्या टप्प्यात उत्तर कोरियाचा धोका अधोरेखित करून सरावाची आखणी करण्यात आली आहे.

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियातील सेमीकंडक्टरचा कारखान्यावर हल्ला किंवा विमानतळावर दहशतवादी हल्ला किंवा उत्तर कोरियाच्या अणुप्रकल्पातील अणुऊर्जा यावरील हल्ल्याचा सराव केला जाईल. तर दुसऱ्या टप्प्यातील सरावात लाईव्ह फायरद्वारे प्रतिहल्ल्याची तयारी केली जाणार आहे. २०१७ सालानंतर अमेरिका व दक्षिण कोरियामध्ये हा सराव आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात आपल्या क्षेपणास्त्र चाचण्यांद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या उत्तर कोरियाच्या धोक्याविरोधात हा सराव आयोजित केल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे.

अमेरिका व दक्षिण कोरियातील सराव आपल्याविरोधात युद्धाची तयारी असल्याचा आरोप उत्तर कोरियाने याआधी केला होता. हा सराव वेळीच रोखला नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी उत्तर कोरियाने दिली होती. त्यामुळे अमेरिका व दक्षिण कोरियातील या सरावावर उत्तर कोरियाकडून प्रतिक्रिया आलेली नाही. पण चीनमधील कम्युनिस्ट राजवटीच्या मुखपत्राने अमेरिका व दक्षिण कोरियातील हा सराव म्हणजे सामर्थ्याचे प्रदर्शन मांडणारा प्रकार असल्याची टीका केली.

या युद्धसरावातून या क्षेत्रात तणाव निर्माण करण्याचे अमेरिकेचे खरे हेतू अधिक स्पष्टपणे उघड होत असल्याचा आरोप चीनच्या मुखपत्राने केला. कोरियन क्षेत्रात स्थैर्य निर्माण करण्यापेक्षा अमेरिकेचा हा सराव येथील तणाव वाढविणारा ठरेल, असा ठपका कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्राने ठेवला. असा युद्धसराव करून अमेरिका संघर्षाची तयारी करीत असल्याचे बीजिंगस्थित विश्लेषकाच्या हवाल्याने चिनी मुखपत्राने हा दावा केला.

leave a reply