भारताने अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन केलेले नाही

- अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या उपमंत्र्यांचा निर्वाळा

US-sanctionsमुंबई – अमेरिकेने रशियावर टाकलेल्या निर्बंधांचे भारतीय कंपन्यांनी उल्लंघन केल्याचा एकही पुरावा नाही, असा निर्वाळा अमेरिकेने दिला आहे. भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाचे उपमंत्री वॉली एडायमो यांनी ही घोषणा करून यावरील वादावर पडदा टाकल्याचे दिसत आहे. रशियाकडून भारत खरेदी करीत असलेल्या इंधनाशी निगडीत असलेल्या उत्पादनांची अमेरिकेला निर्यात केली जात आहे. यामुळे अमेरिका भारतावर नाराज असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल महापात्रा यांनी केला होता. पण याबाबत एडायमो यांनीच खुलासा करून हा वाद निकालात काढला आहे. युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले होते. मात्र युरोपिय देश रशियन इंधनावर अवलंबून आहेत, ही बाब लक्षात घेऊन अमेरिकेने रशियाच्या इंधन निर्यातीवरील निर्बंधांचा पटका आपल्या मित्रदेशांना बसणार नाही, याची दक्षता अमेरिकेने घेतली होती. त्यामुळेच युक्रेनच्या युद्धानंतर रशियाकडून इंधनाची खरेदी वाढविणाऱ्या भारतावर अमेरिका निर्बंध लादू शकली नाही. तरीही भारताने रशियाकडून इंधन खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेने दबाव वाढविला होता. त्याकडे भारताने दुर्लक्ष केले होते. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल महापात्रा यांनी रशियाकडून खरेदी केलेल्या इंधनापासून तयार झालेल्या काही उत्पादनांची अमेरिकेला निर्यात करण्यात आल्याची माहिती देऊन यामुळे अमेरिका भारतावर नाराज असल्याचे म्हटले होते. अमेरिकेबरोबरील भारताच्या संबंधांवर याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात येत असताना, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाचे उपमंत्री वॉली एडायमो यांनी भारतीय कंपन्यांनी अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन केलेले नाही, असे जाहीर केले. यासंदर्भातला एकही पुरावा नसल्याचे सांगून त्यांनी हा मुद्दा निकाली काढला आहे. वॉली एडायमो मुंबईतील आयआयटीला भेट देत असताना पत्रकारांशी केलेल्या चर्चेत ही विधाने केली. दरम्यान, एडायमो यांच्यासह अमेरिकेचे उच्चस्तरिय शिष्टमंडळ भारताच्या भेटीवर आले असून त्यांच्या या भेटीत दोन्ही देशांमधील व्यापारी सहकार्य अधिक व्यापक करण्यावर सखोल चर्चा होईल. अमेरिकेचे हे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहे. तसेच युक्रेनच्या युद्धाबाबतही भारताच्या प्रतिनिधींशी अमेरिकेचे हे शिष्टमंडळ चर्चा करणार असल्याचे दावे केले जातात. पण त्याचे तपशील उघड करण्यात आलेले नाहीत. एडायमो व त्यांचे सहकारी भारतीय उद्योजकांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जाते.

leave a reply