भारतात चीनच्या नव्या व्हायरसची साथ येण्याची भीती

- 'आयसीएमआर'चा इशारा

नवी दिल्ली – चीनमधून सुरू झालेल्या कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेचे संकेत मिळत असतानाच, भारतात नव्या चिनी व्हायरसचा प्रसार होण्याची भीती ‘इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च’ने(आयसीएमआर) व्यक्त केली आहे. ‘कॅट क्यू व्हायरस’ असे या नव्या विषाणूचे नाव असून त्यामुळे मेंदूशी निगडित आजार होऊ शकतात, असा इशारा ‘आयसीएमआर’ने दिला आहे. चीनव्यतिरिक्त व्हिएतनाममध्येही हा विषाणू आढळल्याचे सांगण्यात येते.
नव्या व्हायरसची साथ
या वर्षाच्या सुरुवातीला चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसने सध्या जगभरात हाहाकार माजविला आहे. हा व्हायरस चीनने प्रयोगशाळेत विकसित करून जगभरात पसरू दिला, असे दावे करण्यात येत आहेत. हे दावे करणाऱ्या संशोधकांनी चीनने असे अनेक व्हायरस तयार केल्याचा आरोपही केला आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधून आलेल्या नव्या व्हायरसची माहिती लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजि’ या संस्थेने केलेल्या तपासणीत, दोन नमुन्यांमध्ये ‘कॅट क्यू व्हायरस’ आढळल्याचे ‘आयसीएमआर’च्या अहवालात सांगण्यात आले आहे. हा विषाणू डासांमार्फत पसरू शकतो, अशी माहितीही समीर आली आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजि’च्या तपासणीनंतर मानवी पातळीवर याचा संसर्ग अद्याप दिसून आलेला नाही. मात्र पुढील काळात भारतात त्याचा प्रसार होऊ शकतो, असा इशारा ‘आयसीएमआर’ने दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये ‘ब्रुसेलॉसिस’ विषाणूचे हजारो रुग्ण आढळले होते. हा विषाणूदेखील इतर देशांमध्ये पसरू शकतो, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे ‘आयसीएमआर’ने दिलेला नवा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply