संसद सदस्यावरील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनमध्ये ‘लोन वुल्फ’ दहशतवादी हल्ले वाढण्याची भीती

- गुप्तचर यंत्रणांचा इशारा

लंडन – गेल्या आठवड्यात ब्रिटनमधील वरिष्ठ संसद सदस्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशात ‘लोन वुल्फ’ प्रकारातील दहशतवादी हल्ले वाढू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणा तसेच विश्‍लेषकांनी दिला. कोरोना साथीच्या काळात घरात असलेल्यांकडून इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता व त्यातून अनेक कट्टरपंथिय तयार झाले असण्याची शक्यता आहे, याकडेही इशार्‍यात लक्ष वेधण्यात आले. गेल्या शुक्रवारी ब्रिटनमधील साऊथेंडचे संसद सदस्य सर डेव्हिड ऍमेस यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या सोमाली वंशाच्या अली हरबी अली या २५ वर्षीय ‘लोन वुल्फ’ दहशतवाद्याने केल्याचे उघड झाले आहे.

संसद सदस्यावरील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनमध्ये ‘लोन वुल्फ’ दहशतवादी हल्ले वाढण्याची भीती - गुप्तचर यंत्रणांचा इशारासर ऍमेस यांच्या हत्येनंतर ब्रिटनमधील संसद सदस्यांची सुरक्षा व दहशतवादाचा धोका हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी ब्रिटनच्या दहशतवादविरोधी दलाच्या माजी प्रमुखांनी एक अहवाल संसदेला सादर केला होता. या अहवालात, कट्टरपंथियांच्या गटांविरोधात अधिक आक्रमक तरतुदींची शिफारस करण्यात आली होती. मात्र या अहवालावर पुढे कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. याच पार्श्‍वभूमीवर संसद सदस्यांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने ब्रिटनमधील राजकीय तसेच सुरक्षा वर्तुळ ढवळून निघाले आहे.

‘‘‘कोरोनाच्या काळात देशात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जण घरी बसून होते. या कालावधीत घरातून इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला होता. इंटरनेटवरील माहिती व व्हिडिओच्या माध्यमातून अनेक जण कट्टरवादी झाले असण्याची शक्यता आहे. यातूनच ‘लोन वुल्फ’ प्रकारातील दहशतवादीही तयार झाले असण्याची भीती आहे. हे ‘लोन वुल्फ’ दहशतवादी पुढील काळात ब्रिटनमध्ये हल्ले चढवू शकतात’’, असा इशारा देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

संसद सदस्यावरील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनमध्ये ‘लोन वुल्फ’ दहशतवादी हल्ले वाढण्याची भीती - गुप्तचर यंत्रणांचा इशारादहशतवादविरोधी दल तसेच ‘एमआय५’ या दोन्ही यंत्रणांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केल्याचे सुरक्षाविषयक सूत्रांनी म्हटले आहे. संसद सदस्य सर ऍमेस यांच्यावर हल्ला करणार्‍या अली या सोमाली वंशाच्या दहशतवाद्यानेही इंटरनेवरील कट्टरपंथिय धर्मगुरुंच्या व्हिडिओतून प्रेरणा घेतल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.

अलीला काही वर्षांपूर्वी ब्रिटीश सुरक्षायंत्रणांकडून चालविण्यात येणार्‍या ‘प्रिव्हेंट’ या दहशतवादविरोधी उपक्रमातही सहभागी करण्यात आले होते. मात्र तरीही त्याचा धोका ओळखण्यात ब्रिटीश यंत्रणा कमी पडल्याचे सांगण्यात येत आहे.

याच पार्श्‍वभूमीवर ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल यांनी, दहशतवादाविरोधातील मोहीमेची व्याप्ती वाढविण्याचे संकेत दिले. ‘प्रिव्हेंट’सारख्या उपक्रमात कच्चे दुवे असल्यास ते दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी संसद सदस्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी पावले उचलली जातील, असेही ब्रिटीश गृहमंत्र्यांनी नमूद केले.

leave a reply