कट्टरवाद व दहशतवादापासून भारत-इस्रायलला एकसमान धोका

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

जेरूसलेम – कट्टरवाद आणि दहशतवाद यापासून भारत व इस्रायलला एकसमान धोका संभवतो, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. पाच दिवसांच्या इस्रायल भेटीवर असलेल्या जयशंकर यांनी उभय देशांमधील सुरक्षाविषयक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करीत असताना दोन्ही देशांना असलेल्या या धोक्याची जाणीव करून दिली. त्याचबरोबर भारत व इस्रायलमध्ये पुढच्या महिन्यापासून मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा जयशंकर यांनी केली. या भेटीत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांसह अमेरिका व संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा पार पडणार असल्याचे उघड झाले आहे.

कट्टरवाद व दहशतवादापासून भारत-इस्रायलला एकसमान धोका - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरअफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आली असून यामुळे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचे आव्हान अधिकच तीव्र बनेल असे दावे केले जातात. पाकिस्तानने इस्रायलचे अस्तित्त्व मानण्यास नकार दिलेला असून तालिबाननेही त्याचे अनुकरण करून आपण इस्रायलला मान्यता देणार नसल्याचे जाहीर केले आहे. दहशतवादी तसेच कट्टरवादी संघटनांपासून भारतासह इस्रायलला गंभीर धोका संभवतो, याची जाणीव करून देऊन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दोन्ही देशांमधील सुरक्षाविषयक सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले. लोकशाही व विविधता यावर विश्‍वास असणारे भारत आणि इस्रायल जगाला आपले घर मानणारे देश आहेत, असे जयशंकर म्हणाले.

इस्रायलमधील भारतीय समुदायला संबोधित करताना, भारताच्या उभारणीत इस्रायलींनी दिलेल्या योगदानाचा परराष्ट्रमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच भारत आणि इस्रायलमधील ऐतिहासिक संबंधांचा दाखला देऊन ज्यूंच्या धर्मग्रंथातही भारताबरोबरील संबंधांचा उल्लेख आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले. कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरू असताना, भारताला इस्रायलकडून बहुमोल सहकार्य मिळाले, याचीही आठवण जयशंकर यांनी करून दिली. पण हे सहकार्य आपल्याला नव्या उंचीवर नेता येईल का? असा प्रश्‍न करून भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दोन्ही देशांमधील संशोधक व विद्यार्थ्यांमधील संपर्क व सहकार्य अधिक दृढ करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.

पुढच्या महिन्यापासून भारत व इस्रायलमधील मुक्त व्यापारी करारावर वाटाघाटी सुरू होत आहेत. याची घोषणा करून परराष्ट्रमंत्र्यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. पुढच्या वर्षाच्या जून महिन्यापर्यंत या वाटाघाटी संपुष्टात येतील आणि हा करार संपन्न होईल, असा विश्‍वास जयशंकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, परराष्ट्रमंत्री जयशंकर आपल्या या इस्रायल भेटीत इस्रायली परराष्ट्रमंत्री जेर लॅपिड तसेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल बिन झायेद अल नह्यान यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवरून चर्चा करणार आहेत. याची माहिती इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने उघड केली.

भारत, इस्रायल, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील हे सहकार्य म्हणजे आशियातील नव्या क्वाडची उभारणी ठरते, असे दावे काहीजणांनी केले आहेत. २०२० साली इस्रायलने संयुक्त अरब अमिरात व इतर काही आखाती देशांबरोबर अब्राहम करार केला होता. यामुळे आखाती देश इस्रायलच्या जवळ आले असून ही आखात हलवून टाकणारी घटना ठरते. यामुळे आखाताची स्थितीगती बदलत असताना, भारताची या क्षेत्रातील भूमिका अधिकच महत्त्वाची बनली आहे. इस्रायलचे राजनैतिक अधिकारी याचा दाखला देत असून भारताचा या क्षेत्रातील प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढू लागल्याचे स्पष्ट संकेत देणार्‍या घटना समोर येत आहेत.

अशा परिस्थितीत इस्रायल, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा ही लक्षणीय बाब ठरते. मुख्य म्हणजे इस्रायलचा कट्टर वैरी असलेल्या इराणबरोबरही भारताचे उत्तम संबंध असून अशारितीने दोन्ही देशांशी तितकेच उत्तम संबंध असेलला भारत आपल्या परराष्ट्र धोरणाचा समतोल कायम राखून आहे. ही बाब पुढच्या काळात भारताचा प्रभाव अधिकच वाढविणारी ठरेल, असे संकेत मिळत आहेत.

leave a reply