इंधनवायूच्या उत्खननावरुन हिजबुल्लाहची इस्रायलला धमकी

बैरुत – नैसर्गिक इंधनवायूने समृद्ध असलेल्या भूमध्य समुद्रातील सागरी हद्दीच्या वादावरुन इस्रायल आणि लेबेनॉन आमनेसामने आले आहेत. ‘इस्रायलने लेबेनॉनच्या सागरी हद्दीत घुसून इंधनवायूचे उत्खनन केले तर त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळेल. यामुळे इस्रायल-लेबेनॉनच्या सीमेवर युद्ध भडकले तरी त्याची आम्हाला पर्वा नाही’, अशी धमकी हिजबुल्लाह या लेबेनॉनमधील दहशतवादी संघटनेने दिली. दरम्यान, इस्रायल आणि लेबेनॉनच्या सीमेवर आधीच तणाव निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लेबेनीज लष्कराचे जवान इस्रायलच्या हद्दीत घुसखोरी करीत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

इस्रायलच्या हैफा शहरापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर भूमध्य समुद्रात ‘कारिश’ हा समृद्ध वायू क्षेत्र आहे. इस्रायलच्या ताब्यातील लेव्हियथान आणि तमार या इंधनक्षेत्राच्या शेजारी असलेल्या कारिश इथे 30 कोटी बॅरल्सहून अधिक इंधनवायूचा साठा असल्याचा दावा केला जातो. इंधनवायूचे उत्खनन आणि साठ्यामध्ये आघाडीवर असलेल्या लंडनस्थित ‘एनेगीन’ या कंपनीनने कारिशच्या विकासाबाबत मार्च महिन्यात इस्रायलमधील ‘इस्रायल इलेक्ट्रिक कंपनी’सोबत करार केला होता. यानुसार इस्रायली कंपनी लवकरच कारिशच्या क्षेत्रात इंधनवायूचे उत्खनन करणार आहे.

पण हे कारिश क्षेत्र आपल्या हद्दीत येत असल्याचा दावा लेबेनॉन करीत आहे. तसेच इस्रायलने आपल्या परवानगीशिवाय या क्षेत्रात दुसऱ्या कुणी इंधनाचे उत्खनन सुरू करू नये, असे बजावले आहे. सदर वादग्रस्त क्षेत्रातील इस्रायलच्या कारवाया चिथावणीखोर आणि आक्रमक असल्याचा इशारा लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन यांनी दिला होता. तसेच लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्षांनी देखील इस्रायलला गंभीर परिणामांसाठी तयार राहण्याचे ठणकावले होते. याशिवाय लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्षांनी वादग्रस्त सागरी क्षेत्राप्रकरणी अमेरिकेच्या मध्यस्थीची मागणी केली आहे.

लेबेनीज राष्ट्राध्यक्षांच्या या इशाऱ्याला काही तास उलटत नाही तोच हिजबुल्लाहने इस्रायलला धमकावले आहे. राष्ट्राध्यक्ष एऑन यांनी आदेश दिले तर हिजबुल्लाह लेबेनॉनच्या सागरी हद्दीतील इस्रायलच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देईल, अशी घोषणा हिजबुल्लाहचा क्रमांक दोनचा नेता शेख नईम कासिम याने केली. लेबेनॉनच्या इंधनक्षेत्रातील इस्रायलच्या घुसखोरीला लष्करी सामर्थ्याचा वापर करून उत्तर दिले जाईल, असा दावा शेख कासिमने केला. याने इस्रायल आणि लेबेनॉन सीमेवर नवा संघर्ष पेटला तरी आम्ही त्याची पर्वा करणार नाही, अशी धमकी हिजबुल्लाहच्या नेत्याने दिली.

दरम्यान, इराणसंलग्न हिजबुल्लाहच्या कारवायांमुळे येत्या काळात इस्रायल आणि लेबेनॉनमध्ये संघर्ष भडकेल, अशी चिंता अमेरिकी व इस्रायली विश्लेषकांनी याआधी व्यक्त केली होती. इस्रायलने हिजबुल्लाहविरोधी संघर्षाची तयारी करून ठेवल्याच्या बातम्याही आल्या होत्या. गेल्याच आठवड्यात इस्रायलच्या लष्कराने सायप्रसमध्ये हिजबुल्लाहविरोधी युद्धाचा विशेष सराव केला होता.

leave a reply