अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात पहिला मोठा हल्ला

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी चढविलल्या हल्ल्यात दोन महिला न्यायाधीशांची निघृणपणे हत्या करण्यात आली. त्याचबरोबर हेरात प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात १३ अफगाणी जवानांचा बळी गेला आहे. अमेरिकेच्या सैन्यमाघारीला काही तास उलटत नाही, तालिबानच्या हल्ल्यांची तीव्रता वाढल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानात तैनात असलेल्या किमान २००० जवानांनी माघार घेतली आहे. सध्या अफगाणिस्तानात २५०० जवान तैनात असून तालिबानबरोबर झालेल्या कराराप्रमाणे ही माघार घेतल्याचे अमेरिकेचे हंगामी संरक्षणमंत्री ख्रिस्तोफर मिलर यांनी म्हटले आहे. कतारमधील वाटाघाटीत सहभागी झालेला तालिबानचा कमांडर मोहम्मद नईम याने सोशल मीडियावरुन अमेरिकेच्या या सैन्यमाघारीचे स्वागत केले.

पण शुक्रवारी अमेरिकेचे सैन्य मायदेशी परतलेही नव्हते तोच अफगाणिस्तानात नव्याने दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरू झाली. रविवारी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी दोन महिला न्यायाधीशांच्या मोटारीवर गोळीबार केला. यात दोघीही जागीच ठार झाल्या. तर शनिवारी रात्री हेरात प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणी लष्कराच्या तळात घुसखोरी करून हल्ला चढविला. या हल्ल्यात १३ जवान ठार झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

त्यामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेतली असली तरी या देशातील दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता कायम आहे. तालिबानचे प्रतिनिधी कतारमध्ये वाटाघाटी करीत असले तरी या देशातील तालिबानी कमांडर्सवर या संघटनेची पकड नसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच करण्यात आला होता. त्यामुळे तालिबानची अफगाणिस्तानातील संघर्षबंदी कधीही यशस्वी होणार नसल्याचा इशारा अफगाणी नेत्याने केला होता.

leave a reply