इराणने हिंदी महासागरात लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली

वॉशिंग्टन – इराणने शनिवारी एक हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांची चाचणी केली. यापैकी एक क्षेपणास्त्र हिंदी महासागरातून प्रवास करणार्‍या व्यापारी जहाजापासून २० मैल अंतरावर कोसळले. तर दुसरे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या ‘निमित्झ’ या विमानवाहू युद्धनौकेपासून १०० मैल अंतरावर कोसळल्याची बातमी अमेरिकी वृत्तवाहिनीने दिली आहे. तर ही क्षेपणास्त्र चाचणी करून इराणने शत्रूदेशांना उत्तर दिल्याचे इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून इराणने होर्मुझच्या आखातात मोठा युद्धसराव सुरू केला आहे. या युद्धसरावात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या नौदलातील ७०० गस्तीनौका तसेच जलदगतीची जहाजे सहभागी झाली होती. पाच हेलिकॉप्टर्स वाहून नेणारी स्वदेशी बनावटीचे जहाज या युद्धसरावात सहभागी झाले होते. या व्यतिरिक्त टेहळणी ड्रोन्सपासून हल्ले चढविणार्‍या ड्रोन्सचा स्वतंत्र सराव पार पडला होता. हा युद्धसराव सुरू असताना इराणच्या लष्कराने होर्मुझच्या किनारपट्टीजवळ भुयारात क्षेपणास्त्रांचा मोठा साठा केल्याची घोषणा इराणने केली होती. याचे फोटोग्राफ्सही इराणच्या लष्कराने प्रसिद्ध केले होते. तर दोन दिवसांपूर्वी होर्मुझच्या आखातात गस्त घालणार्‍या इराणच्या हेलिकॉप्टर्सने काही फोटोग्राफ्स टिपले होते. या फोटोग्राफ्समध्ये अमेरिकेची आण्विक पाणबुडी ‘युएसएस जॉर्जिया’ दिसत असल्याचा दावा इराणने केला होता. इराणने सदर फोटोग्राफ्स माध्यमांमध्ये प्रसिद्ध करून अमेरिकेच्या पाणबुड्या इराणच्या नजरेतून सुटू शकत नसल्याचे म्हटले होते. इराणच्या या युद्धसरावावर अमेरिका किंवा आखाती देशांना प्रतिक्रिया दिली नव्हती.

पण शनिवारी इराणने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन या क्षेत्रातील तणावात भर टाकली. अमेरिकेतील प्रख्यात वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, इराणने किमान दोन क्षेपणास्त्रे हिंदी महासागराच्या दिशेने प्रक्षेपित केली. यातील एक क्षेपणास्त्र सदर क्षेत्रातून प्रवास करणार्‍या व्यापारी जहाजापासून २० मैल अंतरावर, तर दुसरे क्षेपणास्त्र ‘निमित्झ’ विमानवाहू युद्धनौकेपासून १०० मैल अंतरावर कोसळले.

या व्यतिरिक्त आपल्या अन्य क्षेपणास्त्राने १११८ मैल अंतरावर लक्ष्य म्हणून तैनात केलेल्या जहाजाला जलसमाधी दिल्याची माहिती इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिली. यासाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आल्याची माहिती इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. त्याचबरोबर सागरी क्षेत्रातील लक्ष्य भेदण्यासाठी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करून इराण आपल्या शत्रूदेशांना इशारा देत आहे. पुढच्या काळात इराणच्या हितसंबंधांना धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झालाच तर इराणची क्षेपणास्त्रे शत्रूदेशाची जहाजे नष्ट करतील, अशी धमकी इराणच्या लष्कराचे प्रमुख मेजर जनरल बाघेरी यांनी दिली.

इराणकडून आखातातील अमेरिका तसेच अमेरिकेच्या मित्रदेशांना इराणपासून धोका असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या पार्श्‍वभूमीवर, गेल्या महिन्याभरात अमेरिकेने पर्शियन आखातातील आपली तैनाती वाढविली आहे. अमेरिकेची महाकाय विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस निमित्झ’, आण्विक पाणबुडी ‘युएसएस जॉर्जिया’ आणि अण्वस्त्रवाहू बी-५२ बॉम्बर्स विमानांना अमेरिकेने तैनात केले आहे.

अशा परिस्थितीत, इराणने अमेरिकी युद्धनौकेच्या दिशेने क्षेपणास्त्र प्रक्षेपित करून अमेरिकेला धमकी दिल्याचा दावा केला जातो. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीला अवघे तीन दिवस शिल्लक असताना इराण ही आगळीक करीत आहे.

leave a reply