पहिली ‘पी१५बी स्टेल्थ गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर’ नौदलाकडे सुपूर्द

मुंबई- प्रोजेक्ट १५ बी अंतर्गत (पी१५बी) माझगाव गोदीत उभारण्यात येणार्‍या स्टेल्थ मिसाईल गायडेड विनाशिकांपैकी पहिली विनाशिका ‘आयएनएस विशाखापट्टणम’ नौदलाकडे चाचण्या पूर्ण झाल्यानंतर सुपूर्द करण्यात आली आहे. लवकरच ही विनाशिका नौदलाच्या ताफ्यात औपचारिकरित्या दाखल करून घेतली जाईल. नौदलाने याबाबतची माहिती दिली.

पहिली ‘पी१५बी स्टेल्थ गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर’ नौदलाकडे सुपूर्दआयएनएस विशाखापट्टणम ही प्रोजेक्ट१५बी अंतर्गत उभारण्यात येणार्‍या चार विनाशिकांपैकी पहिली विनाशिका आहे. ‘विशाखापट्टणम क्लास डिस्ट्रॉयर’ किेंवा ‘पी१५ब्राव्हो क्लास डिस्ट्रॉयर’ असे या विनाशिकेच्या श्रेणीला नाव देण्यात आले आहे. या श्रेणीला ‘पी१५बी’ अशा नावानेही ओळखले जाते. २०११ साली ३५ हजार कोटींच्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती व याअंतर्गत बांधण्यात येणार्‍या चार विनाशिकांपैकी पहिल्या युद्धनौकेची बांधणी ही २०१३ साली सुरू करण्यात आली. तर २०१५ साली यातील पहिली विनाशिका ‘आयएनएस विशाखापट्टणम’चे जलातरण पार पडले. वेळापत्रकाप्रमाणे गेल्यावर्षी ही विनाशिका नौदलाच्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र चाचण्यादरम्यान या विनाशिकेवर घडलेल्या आगीच्या घटनेमुळे हे वेळापत्रक थोडे लांबल्याचे सांगितले जाते.

आता ही विनाशिका सर्व चाचण्यानंतर नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यामुळे नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेण्याची केवळ औपचारीकता उरली असून लवकरच हा समारोह पार पडणार असल्याचे म्हटले जाते. २८ ऑक्टोबरला माझगाव डॉकमध्ये नौदल अधिकार्‍यांना या विनाशिकेचा ताबा देण्यात आला.

या स्टेल्थ विनाशिका भारतीय नौदलातील सर्वात अत्याधुनिक विनाशिकेपैकी एक असणार आहे. यामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत वाढ होईल. ‘आयएनएस विशाखापट्टणम’ जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवर हवेत मारा करणारी आणि पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. यामध्ये ‘३२ बराक-८इआर सॅम’ (एलआर-सॅम) आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. तसेच पाणबुडीविरोधी युद्धतंत्राने सुसज्ज असलेली ही विनाशिकेवर हेलिकॉप्टर्सही तैनात असतील. याशिवाय रॉकट लॉन्चर, ७६ एमएम गनही आणि अत्याधुनिक रडार यंत्रणा तैनात आहेत. विनाशिकेवरील ७५ टक्के यंत्रणा या स्वदेशी आहेत. ही विनाशिका १६३ मीटर लांबीची असून ७४०० टन वजानाची आहे व ताशी ३० सागरी मैल वेगाने ही विनाशिका प्रवास करू शकते.

दरम्यान, ‘पी१५बी’ श्रेणीतील दुसरी विनाशिका ‘आयएनएस मारमुगाओ’चे जलावतरण २०१६ साली पार पडले होते. या विनाशिकेच्याही सर्व यंत्रणा बसविल्यावर सध्या सागरी चाचण्या सुरू आहेत. पुढील वर्षी ही विनाशिकाही नौदलाकडे सुपूर्द होण्याची शक्यता आहे. ‘आयएनएस इंफाल’ या तिसर्‍या विनाशिकेचे जलावतरण एप्रिल २०१९ ला झाले आहे. तर चौथी विनाशिका ‘आयएनएस पोरबंदर’ची बांधणी सध्या माझगाव डॉकमध्ये सुरू आहे.

leave a reply