दहशतवादाचे समर्थन करणार्‍या पाकिस्तानच्या पाच कट्टरपंथियांची स्पेनमध्ये धरपकड

बार्सिलोना – पाकिस्तानमधील ‘तेहरिक-ए-लबैक पाकिस्तान’ (टीएलपी) या कट्टरपंथी संघटनेचे समर्थक असणार्‍या पाच पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांना स्पेनच्या सुरक्षायंत्रणांनी अटक केली. पाचही जणांवर दहशतवादविरोधी कायद्याखाली कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानी समर्थकांकडे ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रचारसाहित्य मिळाल्याचे स्पेनच्या सुरक्षायंत्रणांनी स्पष्ट केले.

२०२० साली फ्रान्समध्ये झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात झहीर हसन महमूद या पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली होती. झहीर पाकिस्तानच्या ‘टीएलपी’शी संबंधित असल्याचे उघड झाले होते. त्याचवेळी झहीर स्पेनमधील काही जणांच्या संपर्कात आल्याची माहितीही समोर आली होती. या माहितीच्या आधारे स्पॅनिश यंत्रणांनी तपास सुरू केला होता.

या तपासात स्पेनमध्ये राहणारे पाकिस्तानी वंशाचे नागरिक इंटरनेटवरून ‘टीएलपी’च्या कट्टरपंथी विचारसरणीचे तसेच दहशतवादी कारवायांचे समर्थन करीत असल्याचे समोर आले. फेसबुक तसेच टिकटॉकच्या माध्यमातून उर्दू भाषेत दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणारे संदेश पाठविण्यात येत असल्याचे दिसून आले होते. संशयित पाकिस्तानी नागरिकांना फ्रान्स, इटली, ग्रीस यासारख्या देशातून समर्थन मिळत असल्याचे आढळले. या आधारावर स्पॅनिश यंत्रणांनी ‘युरोपोल’च्या सहाय्याने मोहिम हाती घेतली होती.

स्पेनमधील बार्सिलोनासह गेरोना, उबेदा व ग्रॅनाडा या भागात धाडी टाकण्यात आल्या. या धाडींमध्ये पाच पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांना अटक करण्यात आली. यापूर्वीही ब्रिटन, फ्रान्ससह इतर युरोपिय देशांमध्ये कट्टरपंथी पाकिस्तानी नागरिकावर दहशतवादाचे समर्थन करीत असल्याच्या आरोपांवरून कारवाई करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

leave a reply