आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर कडाडले

- कच्चे तेल ११२ डॉलर्स तर नैसर्गिक इंधनवायू २२०० डॉलर्सवर

मॉस्को/लंडन/न्यूयॉर्क – रशिया-युक्रेन युद्धाचे गंभीर पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उमटले आहेत. बुधवारी कच्च्या तेलाच्या दरांनी जबरदस्त उसळी घेत ११० डॉलर्स प्रति बॅरलवर झेप घेतली. तर नैसर्गिक इंधनवायूचे दर हजार घनमीटरमागे २,२०० डॉलर्सवर पोहोचले आहेत. नैसर्गिक इंधनवायूच्या दरांनी पहिल्यांदाच ही विक्रमी पातळी गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचवेळी रशियाचे चलन रुबलचीही घसरण सुरू असून अमेरिका व युरोपमधील शेअरबाजारांनाही मोठा फटका बसला आहे.

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याला सात दिवस झाले असून युद्धाची तीव्रता वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. युद्ध सुरू असतानाच अमेरिका, युरोप व मित्रदेशांनी रशियन अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. युद्ध व पाश्‍चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध याचे मोठे परिणाम बाजारपेठेत दिसू लागले आहेत.

बुधवारी कच्च्या तेलाच्या दरांनी जवळपास साडेसात टक्क्यांची उसळी घेत ११२ डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला. गेल्या सात वर्षातील ही सर्वोच्च पातळी आहे. पुढील काही दिवसात हे दर १२० ते १३० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात, असा इशारा विश्‍लेषकांनी दिला. कच्च्या तेलापाठोपाठ नैसर्गिक इंधनवायुचे दरही कडाडले आहेत. बुधवारी युरोपमधील बाजारपेठेत झालेल्या व्यवहारांमध्ये प्रति हजार घनमीटरमागे २,२२६ डॉलर्स असा विक्रमी दर नोंदविण्यात आला. नैसर्गिक इंधनवायू बाजारपेठेच्या इतिहासातील ही आतापर्यतची सर्वाधिक पातळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रशिया-युक्रेन संघर्षामुळे पुढील काही दिवस नैसर्गिक इंधनवायुच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होईल, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.

इंधनाचे दर कडाडत असतानाच आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिका व युरोपमधील शेअर निर्देशांक दीड ते तीन टक्क्यांनी खाली आले आहेत. त्याचे परिणाम आशियाई शेअरबाजारातही दिसून आले असून जपान, दक्षिण कोरिया, चीन, हॉंगकॉंग व भारतातील शेअरबाजारात पडझड झाल्याचे सांगण्यात येते. रशियातील शेअरबाजारांनी व्यवहार बंद ठेवले असून चलन रुबलमधील घसरण अजूनही कायम आहे. रशियावर लादलेल्या कडक निर्बंधांनंतर आघाडीच्या बँका तसेच कंपन्यांनी युरोपमधील आपले उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या इंधनक्षेत्रावर अद्याप निर्बंध टाकण्यात आले नसले तरी आंतरराष्ट्रीय बाजापेठांमध्ये रशिया सवलतीच्या दरात इंधनाची विक्री करीत असल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

leave a reply