अमेरिका व तैवानमध्ये पंचवार्षिक सहकार्य करार

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारलेल्या ‘तैवान पॉलिसी’ अंतर्गत दोन देशांमध्ये आर्थिक चर्चेला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये पार पडलेल्या या द्विपक्षीय चर्चेत पंचवार्षिक सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केरण्यात आल्या. या करारानुसार, पुढील पाच वर्षात अमेरिका आणि तैवान आरोग्य, तंत्रज्ञान व सुरक्षा क्षेत्रातील परस्पर भागीदारी अधिक मजबूत करणार आहे. शुक्रवारी झालेली चर्चा व पंचवार्षिक करार दोन देशांमधील संभाव्य व्यापारी कराराचा प्राथमिक टप्पा असल्याचे मानले जाते.

चीनबरोबरील व्यापारी तूट, कोरोनाची साथ व चिनी राजवटीकडून सुरू असणाऱ्या कारवाया या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. तैवानबरोबरील वाढती जवळीक हा त्याचाच भाग मानला जातो. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ‘तैवान हा चीनचा भाग नाही’ असे वक्तव्य करून चीनला जबरदस्त धक्का दिला होता. त्याचवेळी चीनविरोधात सुरू असलेली मोहीम संपली नसल्याचा इशाराही दिला होता. ‘अमेरिका-तैवान इकॉनॉमिक प्रॉस्परिटी पार्टनरशिप डायलॉग’ व सहकार्य करार त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरतो.

अमेरिकेने तैवानला मोठ्या प्रमाणात संरक्षणसहकार्य पुरविले असून चीनविरोधातील संघर्षात सुरक्षेची जबाबदारीही स्वीकारली आहे. अमेरिकेने गेल्या चार महिन्यात आपले दोन वरिष्ठ अधिकारी तैवानच्या दौऱ्यासाठी धाडले होते. या पार्श्‍वभूमीवरच, अमेरिकेतून तैवानबरोबरील सहकार्य अधिक बळकट करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यात तैवानच्या सुरक्षेसाठी लष्करी तळ उभारावा तसेच द्विपक्षीय व्यापारी करार करावा, या प्रस्तावांचाही समावेश आहे.

leave a reply