जगातील कोरोना रुग्णांची संख्या सहा पटींनी अधिक असल्याचा दावा

कॅनबेरा/लंडन – जगभरात सध्या नोंदविण्यात आलेल्या कोरोना साथीच्या रुग्णांपेक्षा सहा पट अधिक रुग्ण प्रत्यक्षात असू शकतात, असा खळबळजनक दावा जपान व ऑस्ट्रेलियन संशोधकांनी केला आहे. ब्रिटनस्थित ‘रॉयल सोसायटी ओपन सायन्स’ने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. 15 देशांमधील लोकसंख्या व रुग्णवाढीचा दर यांचा अभ्यास केल्यानंतर सदर दावा करण्यात येत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसात जगातील विविध देशांमध्ये कोरोनाच्या साथीची दुसरी लाट आल्याचे उघड होत असतानाच हा अहवाल समोर आला आहे.

जपानच्या ‘इकिगाई रिसर्च’, ‘द ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न’च्या संशोधकांनी रुग्णसंख्या अधिक असल्याची माहिती दिली. या संशोधकांनी युरोपातील 11 प्रमुख देशांसह अमेरिका, कॅनडा, दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलियातील रुग्णसंख्येचा अभ्यास करून आपला अहवाल तयार केला आहे. मार्च ते ऑगस्ट या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला असून 15 देशांमधील सरासरी रुग्णसंख्या तब्बल सहा पटींनी अधिक असल्याचे आढळले आहे. इटलीसारख्या देशात अधिकृत पातळीवर करण्यात आलेल्या नोंदीपेक्षा प्रत्यक्षातील रुग्णांची संख्या तब्बल 17 पटींनी अधिक आढळली, अशी धक्कादायक माहिती अहवालात देण्यात आली आहे.

देशांमध्ये नोंदविण्यात आलेली कोरोना रुग्णांची संख्या, त्यांची लक्षणे, त्यातील बळींची संख्या आणि त्यासाठी लागलेला वेळ यासारख्या घटकांचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात आले. हे निष्कर्ष साधारण 95 टक्क्यांपर्यंत बरोबर येत असल्याचे आढळले आहे, अशी माहिती अहवाल तयार करणाऱ्या संशोधकांनी दिली. खरे रुग्ण व जाहीर करण्यात आलेली आकडेवारी यातील तफावतीचे प्रमुख कारण साथीची चाचणी करण्याची अपुरी क्षमता हे असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला. बहुतांश देशांमध्ये प्रत्येकी हजार नागरिकांमागे करण्यात येणाऱ्या चाचण्यांची संख्या अत्यंत कमी असल्याचा ठपकाही अहवालात ठेवण्यात आला आहे.

अमेरिकेच्या ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या पाच कोटी 77 लाख 26 हजार 802 झाली असून, 13 लाख 74 हजार 985 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील बळींची संख्या दोन लाख 54 हजारांवर गेली आहे. एक लाखांहून अधिक रुग्ण दगावणारा मेक्सिको हा जगातील चौथा देश ठरला आहे. त्याचवेळी सध्या युरोपात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचाही दावा समोर आला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीत सध्या युरोपात सरासरी 2 लाख 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. सर्बिया या देशात रुग्णवाढीचा वेग तब्बल 68 टक्क्यांवर गेल्याचेही सांगण्यात आले आहे.

leave a reply