अमेरिकेत सलग तिसऱ्या दिवशी ६० हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले

बाल्टिमोर – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसने जगभरातील पाच हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला. तर सलग चौथ्या दिवशी जगभरात दोन लाखाहून अधिक नवे रुग्ण सापडल्यामुळे या साथीच्या नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतच सलग तिसऱ्या दिवशी ६० हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले. अमेरिकेतील फ्लोरिडा, कॅलिफोर्निया या प्रांतांमध्ये दरदिवशी दहा हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत.

America-Coronaजगभरातील प्रमुख देशांनी लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे आणि जनतेच्या बेपर्वाईमुळे कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सध्या जगभरात कोरोनाचे १,२८,९६,६५१ रुग्ण आहेत. तर ५,६८,५७८ जणांचा या साथीने बळी घेतला आहे. एकट्या अमेरिकेत कोरानाने १,३७,७२९ जण दगावले असून या देशात गेल्या चोवीस तासात ७६० रुग्णांचा बळी गेल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. तर ब्राझीलमध्ये एका दिवसात १,०७१ रुग्ण दगावले. गेल्या काही दिवसांमध्ये जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या कमी झाली असली तरी या साथीच्या रुग्णांची संख्या भयावहरित्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते.

जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत आघाडीवर असलेल्या अमेरिका, ब्राझील आणि भारत या तीन देशांमध्ये गेल्या चोवीस तासात सव्वा लाखाहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी अमेरिकेत ६६,५२८ नवे रुग्ण आढळले असून गेल्या पाच पैकी चार दिवसांमध्ये ६० हजारांहून अधिक रुग्ण सातत्याने सापडत आहेत. अमेरिकेतील कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये ६१ मरिन्सचाही समावेश आहे.

America-Coronaजपानच्या ओकिनावा बेटावर तैनात असलेले अमेरिकी मरिन्स या साथीने बाधित झाल्याची माहिती, ओकिनावा प्रांताच्या प्रमुखांनी दिली. त्यानंतर ओकिनावा बेटावरील अमेरिकेचे दोन तळ लॉकडाउन करण्यात आले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी लष्करी रूग्णालयाला भेट दिली. यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चेहऱ्यावर मास्क लावून सैनिकांना भेटत असल्याची बातमी अमेरिकी माध्यमांनी प्रसिद्ध केली. अमेरिकेत कोरोनाच्या साथीचा फैलाव सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मास्क घातल्याची चर्चा अमेरिकी माध्यमांमध्ये सुरू आहे. येथे उपचार घेत असलेल्या अमेरिकी सैनिकांच्या सुरक्षेसाठी मास्क घालणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लष्करी रुग्णालयाला भेट देण्याआधी सांगितले.

जगभरात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली जात असताना, रशियाने या साथीवरील लसीची यशस्वी चाचणी घेतल्याचा दावा केला आहे. रशियातील सेशेनॉव्ह विद्यापीठाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीने मानवी चाचणीतील सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केल्याचे जाहीर केले. जगभरात कोरोनाव्हायरस प्रतिबंधात्मक लसीवर १४० ठिकाणी संशोधन सुरू आहे. यापैकी फक्त ११ संशोधनांना मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये भारताच्या ‘भारत बायोटेक’ आणि ‘कॅडीला हेल्थकेअर’ या दोन कंपन्यांच्या चाचण्यांचाही समावेश आहे.

leave a reply