जम्मू-काश्मीर लवकरच दहशतवाद मुक्त होईल

- केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंग

श्रीनगर – गेल्या तीन दशकात जम्मू-कश्मीरमध्ये अशांतता माजविण्यासाठी दहशतवादाचा वापर करण्यात आला. मात्र जम्मू-काश्मीरमधील हा दशतवाद आता शेवटच्या घटका मोजत आहे. भारत सरकारने दहशतवाद अजिबात खपवून न घेण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे आता दहशतवादी आपला जीव वाचविण्यासाठी पळत आहेत, असे केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.

Jammu-Kashmirगेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी एका स्थानिक नेत्याची हत्या केली होती. तसेच त्याआधी एका सरपंचाची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. यापार्श्वभूमीवर एका मुलाखतीत केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंग यांनी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या स्थितीचा दाखला दिला. सुरक्षा दलांकडून सतत सुरु असल्या मोहिमांमुळे जीवाच्या भीतीने सैरावैरा पळणारे दहशतवादी सॉफ्ट टार्गेटना शोधून त्यांच्या हत्या करीत आहेत. याचाच अर्थ जम्मू-काश्मीर दहशतवादमुक्त करण्याचा अंतिम टप्पा सुरू असल्याचा दावा जितेंद्र सिंग यांनी केला.

सहा ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरबाबत जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामुळे फुटिरांसोबत जम्मू आणि काश्मीरच्या प्रमुख पक्षाच्या नेत्यानाही दहशतवाद्यांपासून अंतर ठेवावे लागत आहे. शिवाय केंद्र सरकारने दहशतवादावर झीरो टॉलरन्स धोरण बाळगल्यामुळे दहशतवादी सैरभैर झाले आहेत, असे जितेंद्र सिंग म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील डोडा आणि किश्तवाड दहशतवाद्यांचा गड म्हणून ओळखले जात होते. या भागात दहशतवादी हल्ले आणि हत्यांचे सत्र तीन दशके सुरु होते. पण आज डोडा आणि किश्तवाड दहशतवादमुक्त झाले असल्याचे सिंग यांनी लक्षात आणून दिले.

दरम्यान, रविवारी बारामुला जिल्ह्याच्या सोपोरमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. सोपोरच्या रेबन परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक, लष्कराची २२ आरआर आणि सीआरपीएफच्या जवानांनी या परिसराला वेढा घातला. येथे शोध मोहिमेदरम्यान ही चकमक उडाली.

leave a reply