भारत अमेरिकेकडून ७२ हजार ‘सिग ७१६’ रायफल्स खरेदी करणार

America-Indiaनवी दिल्ली – भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अमेरिकेकडून ७२,००० ‘सिग ७१६ असॉल्ट रायफल्स’ची खरेदी करणार असल्याची बातमी आहे. लष्कर दुसऱ्यांदा अमेरिकेकडून ७२ हजार असॉल्ट रायफल्स खरेदी करीत आहे. याआधी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेत तैनात जवानांसाठी भारताने ७२ हजार ‘सिग ७१६ असॉल्ट रायफल्स’ खरेदी केल्या होत्या. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात या रायफली अमेरिकेकडून पुरविण्यात आल्या. त्यानंतर आता पुन्हा आणखी ७२ हजार ‘सिग ७१६ असॉल्ट रायफल्स’ची खरेदी करण्यात येत आहेत.

लडाखच्या सीमारेषेवर चीनच्या विश्वासघातानंतर तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने सुरक्षादलांना सुसज्ज करण्यासाठी संरक्षण साहित्यांच्या खरेदीला वेग दिला आहे. संरक्षण मंत्रालयाने नुकतीच ३८ हजार ९०० कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्य खरेदीला मंजुरी दिली आहे. यामध्ये रशियाकडून ३३ लढाऊ विमाने, वायुसेना व नौदलासाठी २४८ अस्त्र क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षणसाहित्य खरेदीचा समावेश आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच संरक्षणमंत्रालयाने इस्रायलला १६,००० लाईट मशिन गन्सची ऑर्डर दिली होती. आता अमेरिकेकडून ७२ हजार ‘सिग ७१६ असॉल्ट रायफल्स’ खरेदी करण्यात येणार असल्याची बातमी आली आहे.

America-Indiaभारतीय लष्कर ‘फास्ट ट्रॅक प्रोक्युर्मन्ट’ (एफटीएफ) कार्यक्रमाअंतर्गत या रायफल्स खरेदी करीत आहे. याआधी गेल्यावर्षी ७२ हजार ‘सिग ७१६ असॉल्ट रायफल्स’ लष्कराने खरेदी केल्या होत्या. इन्सास रायफल्सला पर्याय म्हणून ‘सिग ७१६ असॉल्ट रायफल्स’ने नॉर्दन कमांडमध्ये तैनात जवानांना सुसज्ज केले जात आहे. दहशतवादविरोधी कारवाई आणि जम्मू काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर तैनात जवानांना या रायफल देण्यात येणार आहेत. तसेच अन्य सुरक्षा दलांना ‘एके -२०३’ रायफल्स पुरविल्या जाणार आहेत. या रायफल्सची अमेठीच्या कारखान्यात भारत आणि रशिया संयुक्तपणे निर्मिती करीत आहे.

leave a reply