भूकंपग्रस्त तुर्कीला सहाय्य पुरविणाऱ्या भारताच्या ‘ऑपरेशन दोस्त’चे परराष्ट्रमंत्र्यांकडून समर्थन

Operation Dostनवी दिल्ली – तुर्की व सिरियातील भूकंपाच्या बळींची संख्या ११,२००च्याही पुढे गेलेली असताना, भारताने या देशांना सहाय्य करण्यासाठी आत्तापर्यंत सहा सी-१७ विमाने भरून सहाय्य धाडले आहे. भारत युद्धपातळीवर तुर्कीला सहाय्य करीत असताना, काहीजणांनी तुर्कीने याआधी भारताच्या विरोधात स्वीकारलेल्या भूमिकेचा दाखला दिला. अशा देशाला सहाय्य करणे कितपत योग्य ठरते, असा प्रश्न सोशल मीडियावर काही भारतीयांनी केला. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना देखील माध्यमांनी यावरून प्रश्न केले होते. त्याला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारत नेहमीच मानवतेच्या बाजूने उभा राहणारा देश आहे, याची जाणीव करून दिली.

earthquake-hit Turkeyआपण दैनंदिन पातळीवर भू-राजकीय स्तरावरचे चढउतार अनुभवत असतो. पण संकटाच्या काळात भारताचे इतर देशांबरोबरील संबंध स्थिर राहिले आहेत. भारताचा वसुधैव कुटुंबकम अर्थात सारे जग हे एक कुटुंबच आहे, या सिद्धांतावर विश्वास आहे. म्हणूनच भारत नेहमीच मानवतेच्या बाजूने उभा राहतो, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी तुर्कीला सहाय्य करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. ‘ऑपरेशन दोस्त’ ही मोहीम राबवून भारताने भयंकर संकटात सापडलेल्या तुर्कीला आत्तापर्यंत भरीव सहाय्य पुरविले.

हे सहाय्य केवळ साहित्य आणि वैद्यकिय मदतीपुरते मर्यादित नाही. तर भारताच्या ‘एनडीआरएफ’ची पथके तुर्कीमध्ये बचावकार्य करीत आहेत. तसेच भारतीय लष्कराच्या वैद्यकिय पथकांद्वारे तुर्कीतील भूकंपग्रस्तांना उपचार आणि औषधे देखील पुरविली जात आहेत.

तुर्कीच्या भूकंपग्रस्त भागांमध्ये भारताने ‘फिल्ड हॉस्पिटल्स’ उभारली असून याचा गरजूंना फार मोठा लाभ मिळत आहे. तुर्कीची भाषा जाणणाऱ्या दोन अधिकारी व परराष्ट्र मंत्रालयाच्या चार अधिकाऱ्यांचाही या पथकांमध्ये समावेश असल्याचे सांगितले जाते. तुर्कीच्या अदानाया शहरात भारताने कंट्रोल रूम उभा केला आहे. तुर्कीमध्ये दहा भारतीय अडकलेले आहेत. हे सारेजण सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. मात्र एक भारतीय बेपत्ता असून त्याच्या भारतातील कुटुंबाशी परराष्ट्र मंत्रालय संपर्क साधून असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारताने भूकंपग्रस्तांसाठी रवाना केलेल्या सहा सी-१७ या अवजड वाहतूक करणाऱ्या विमानांपैकी पाच विमाने तुर्कीत उतरली असून यातील एक विमान भरून सहाय्य सिरियाला रवाना करण्यात आले आहे. सिरियाने या सहाय्यासाठी भारताचे आभार मानले. दक्षिणेकडून आलेला हा आवाज आम्हाला पुढच्या काळातही अपेक्षित आहे, असे सिरियाच्या भारतातील राजदूतांनी म्हटले आहे.

सिरिया व तुर्कीला हे सहाय्य पुरविणाऱ्या देशांमध्ये भारत सर्वात आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. तुर्कीबरोबरील संबंध सुरळीत नसताना देखील भारताने केलेल्या या सहाय्याची दखल पाकिस्तानच्या माध्यमांनीही घेतली. तुर्कीच्या राजदूतांनी देखील या सहाय्यासाठी भारताचे आभार मानले. मित्राच्या सहाय्याला मित्र धावतोच, असे कृतज्ञतापूर्ण विधान तुर्कीच्या भारतातील राजदूतांनी केले आहे.

leave a reply