रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर कारवाईची तयारी करणाऱ्या युरोपिय महासंघाला इराणची धमकी

eu assemblyतेहरान – ‘रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटना घोषित करून काळ्या यादीत टाकण्याची तयारी करणाऱ्या युरोपिय महासंघाने याच्या नकारात्मक परिणामांचा विचार करावा. भावनेच्या भरात अशी कारवाई करून महासंघ आपल्याच पायावर गोळी झाडून घेईल’, असा गंभीर इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री आमिर-अब्दोल्लाहियान यांनी दिला. तर युरोपिय महासंघाने चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम जागतिक स्तरावर उमटतील, अशी धमकी इराणच्या लष्करप्रमुखांनी दिली आहे.

इराणमधील राजवटीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांवर कारवाई करणाऱ्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर कारवाईची तयारी युरोपिय महासंघाने केली आहे. इराणच्या राजवटीशी प्रामाणिक असलेल्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी युरोपिय महासंघाच्या संसदेमध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शंभरहून अधिक युरोपिय नेते या प्रस्तावाचे समर्थन करीत असून लवकरच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला काळ्या यादीत टाकले जाईल, असा दावा केला जातो. अमेरिकेने देखील युरोपिय महासंघाच्या या कारवाईला पाठिंबा दिल्याच्या बातम्या आल्या होत्या.

TURKEY-IRAN-DIPLOMACYअशा परिस्थितीत, इराणचे परराष्ट्रमंत्री आमिर-अब्दोल्लाहियान यांनी गुरुवारी युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटना ठरविण्याचा महासंघाला भावनिक निर्णय अतिशय चूकीचा आणि निंदनीय असल्याची टीका इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. ‘कुठलाही निर्णय घेण्याआधी राजनैतिक स्तरावरील परस्पर सुरक्षेचा आदर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर धमक्यांची भाषा आणि शत्रूत्वाची कारवाई करण्याआधी एकमेकांचा विश्वास वाढविणे जरूरी आहे’, अशा शब्दात इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बोरेल यांनी फटकारले.

पुढच्या आठवड्यात युरोपिय महासंघात रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या प्रस्तावावर मतदान होईल. पण हा निर्णय घेण्याआधी महासंघाने यानंतरच्या नकारात्मक परिणामांचाही विचार करावा. इराणविरोधी कारवाईसाठी भावनेच्या भरात वाहत जाऊन महासंघाचा कुठलाही निर्णय स्वत:च्याच पायावर गोळी झाडून घेणारा ठरेल, असा इशारा अब्दोल्लाहियान यांनी दिला.

iran protestतर इराणच्या लष्करप्रमुखांनी देखील युरोपिय महासंघाचा चुकीचा निर्णय इराणच्या नाही तर जागतिक सुरक्षेवर परिणाम करणारा ठरेल, असे बजावले. युरोपिय महासंघाच्या संसदेत घेतल्या जाणाऱ्या निर्णयामुळे क्षेत्रीय आणि जागतिक सुरक्षा, शांती व समृद्धी बाधित होईल, अशी धमकी इराणच्या लष्करप्रमुखांनी दिली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल कासेम सुलेमानी यांनी सिरियातील संघर्षात आयएसच्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला नसता तर आज युरोपिय देश आयएसच्या नियंत्रणाखाली असते, असा दावा इराणच्या लष्करप्रमखांनी केला.

दरम्यान, इराणचे माजी राजनैतिक अधिकारी देखील निदर्शकांवरील कारवाईवर उघडपणे टीका करीत आहेत. इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांचे माजी सल्लागार हमिद अबोतालेबी यांनी आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण कट्टरपंथियांनी ताब्यात घेतल्याचा आरोप केला. तर निदर्शकांवर कारवाई करून इराणने अणुकरार पुनर्जिवित करण्याची सुवर्ण संधी गमावली, याकडे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयातील माजी वरिष्ठ अधिकारी सईद मोहम्मद सद्र यांनी लक्ष वेधले.

leave a reply