‘फॉक्सकॉन’ भारतात ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली – अ‍ॅपलसाठी मोबाईल असेंबल करणारी तैवानी कंपनी ‘फॉक्सकॉन’ने भारतात तामिळनाडूमध्ये असलेल्या आपल्या प्रकल्पाच्या विस्तारची योजना आखली आहे. यासाठी ही कंपनी भारत ७५०० कोटी रुपयांची (एक अब्ज डॉलर्स) गुंतवणूक करणार असल्याची बातमी आहे. कोरोनाव्हायरसच्या साथीला जबाबदार असलेल्या चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पाडण्याच्या तयारीत आहेत. अ‍ॅपलही तशी पावले उचलत असून यापार्श्वभूमीवर फॉक्सकॉन भारतातील आपल्या प्रकल्पाचा विस्तार करीत आहे.

India-Taiwan-Foxconnगेल्या वर्षभरापासून अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरु होते. त्यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे दोन्ही देशातील आर्थिक संबंध अधिकच ताणले गेले आहेत. अमेरिकी कंपन्यांनी चीनमधून बाहेर पडावे, असे काही दिवसांपूर्वीच अमेरिकन सरकारने बजावले होते. यानंतर अमेरिकी कंपन्या आपले कारखाने दुसरीकडे हलविण्याच्या तयारीत आहेत. या कंपन्या भारताकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. अ‍ॅपलने चीनमधून आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या आहेत. तसेच अ‍ॅपल भारतात आपला उत्पादन कारखाना टाकू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जाते.

अ‍ॅपलने आपल्याशी संलग्न कंपन्यांना चीनमधील उत्पादन प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची विनंती केली असल्याचे एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने नुकतीच बातमी दिली होती. त्यानंतर अ‍ॅपलच्या सहकारी कंपन्यांनी तशा हालचाली सुरु केल्याचे फॉक्सकॉनच्या बातमीवरून स्पष्ट होते. फॉक्सकॉन कंपनीचा चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथील कारखान्याचा विस्तार करण्याची योजना आहे. त्यासाठी कंपनीकड़ून भारतात पुढील तीन वर्षात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे, असा दावा सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.

सध्या श्री पेरुंबुदूर येथे अ‍ॅपलच्या आयफोन एक्सार या मॉडेलचे उत्पादन करण्यात येते. मात्र फॉक्सकॉन कंपनीकडून आयफोनच्या इतर मॉडेल्सचे उत्पादन चीनमधील प्रकल्पातूनच करण्यात येते. यापार्श्वभूमीवर फॉक्सकॉनने भारतातील आपल्या प्रकल्पाच्या विस्ताराच्या घेतलेल्या निर्णयाच्या बातमीचे महत्व वाढते. गेल्याच महिन्यात फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष लियु योंग यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत भारतातील गुंतवणूक वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

leave a reply