फ्रान्स आखातात अस्थैर्य निर्माण करीत असल्याचा इराणचा आरोप

आखातात अस्थैर्यतेहरान/पॅरिस – फ्रान्स आणि युएईमध्ये झालेल्या रफायल लढाऊ विमानांच्या खरेदी करारामुळे इराण अस्वस्थ झाला आहे. ‘आखाती देशांना शस्त्रविक्री करून फ्रान्स या क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करीत आहे. फ्रान्सची शस्त्रास्त्रे आखातात अशांतता माजवतील’, असा आरोप इराणने केला. तर व्हिएन्ना येथे अणुकराराबाबत सुरू असलेल्या चर्चेवरुनही फ्रान्स आणि इराण आमनेसामने आले आहेत. अणुकरारासंबंधी इराणने दिलेला प्रस्ताव स्वीकारण्याजोगा नसल्याचे फ्रान्सने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी युएई तसेच सौदी अरेबियाचा दौरा केला होता. यापैकी युएईच्या दौर्‍यात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद यांची भेट घेतली होती. यानंतर फ्रान्स आणि युएईमध्ये १८ अब्ज डॉलर्सचा हा करार झाला होता. फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार असल्याचा दावा केला जातो. यानुसार फ्रान्स युएईला ८० रफायल विमानांची ‘एफ-४’ ही प्रगती आवृत्ती पुरविणार आहे. त्याचबरोबर १२ हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसर्ंभातील कराराचा यात समावेश होता.

आखातात अस्थैर्यफ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांनी हा करार प्रादेशिक स्थैर्यासाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते. तर यामुळे युएईच्या संरक्षणक्षमतेत मोठी भर पडणार असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी केला होता. फ्रान्स व युएईतील या संरक्षण करारावर इराणने संताप व्यक्त केला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी युएईला संरक्षणसाहित्यांची विक्री करणार्‍या फ्रान्सवर टीका केली.

‘आखाती क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करण्यातील फ्रान्सच्या भूमिकेकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने दुर्लक्ष करू नये. या क्षेत्राचे लष्करीकरण कधीही खपवून घेतले जाणार नाही. फ्रान्स अरब देशांना विक्री करीत असलेली शस्त्रास्त्रे या क्षेत्रात अशांतता माजवतील’, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते खातिबझादेह यांनी दिला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायावरही खातिबझादेह यांनी हल्ला चढविला.

आखातात अस्थैर्य‘अरब देशांना अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांची विक्री केली जाते. पण याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला अजिबात चिंता वाटत नाही. पण इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर त्वरित टीका केली जाते’, असा आरोप खातिबझादेह यांनी केला. इराणचा क्षेपणास्त्र तसेच अणुकार्यक्रम हा जागतिक चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या आठवड्यापासून ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे इराणबरोबरच्या अणुकराराबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिका, युरोपिय देश आणि इराणमध्ये चर्चा सुरू आहे.

चर्चा सुरू होऊन दहा दिवस लोटले आहेत. पण अजूनही अणुकराराबाबत समाधान मिळाले नसल्याचा दावा केला जातो. ‘या अणुकरारात सामील होण्यासाठी इराणने पाश्‍चिमात्य देशांसमोर ठेवलेला प्रस्ताव हा या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व देशांच्या हिताचा ठरत नाही. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारण्याजोगा नाही’, अशी टीका फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

दरम्यान, इराणने २०१५ सालच्या अणुकरारात बिनशर्त सामील व्हावे, अशी मागणी फ्रान्स तसेच ब्रिटन करीत आहे. पण इराणने अमेरिकेसमोर निर्बंध मागे घेण्याची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. इराणच्या या मागणीवर फ्रान्सने आक्षेप घेतल्याचे बोलले जाते.

leave a reply