दांभिक डाव्या विचारसरणीकडून ब्रिटनच्या इतिहासावर होणारे हल्ले रोखणे आवश्यक

- परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांचे आवाहन

डाव्या विचारसरणीकडूनलंडन – ब्रिटन व ब्रिटनमधील जनतेला मागे खेचणारे ओझे फेकून द्यायची वेळ आली असून सांस्कृतिक संघर्ष तसेच दांभिक डाव्या विचारसरणीकडून इतिहासावर होणारे हल्ले संपविणे आवश्यक आहे, असा इशारा ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी दिला. ब्रिटनच्या उच्चभू्र वर्तुळांमध्ये देशाच्या इतिहासाबद्दल लाज वाटायला हवी, अशा स्वरुपाचे मतप्रवाह व्यक्त होत आहेत याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षात आक्रमक व अतिडाव्या गटांची व्याप्ती तसेच कारवाया वाढत असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्याविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले असून, अशा गटांची स्वतंत्र चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

अमेरिकेतील विचारसरणी व आंदोलनांच्या ब्रिटनमधील प्रभावाचा मुद्दा गेल्या वर्षीपासून चर्चेत आला आहे. अमेरिकेत झालेल्या ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’च्या निदर्शनांना समर्थन देण्यासाठी ब्रिटनमध्येही मोर्चे काढण्यात आले होते. बाब मोर्च्यांपुरती मर्यादित न राहता ब्रिटनमधील गटांनी देशातील विद्यापीठांना तसेच इतिहासातील व्यक्तिमत्त्वांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. गेल्या वर्षी एका मोर्च्यादरम्यान माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली होती. ब्रिस्टॉलमध्ये ब्रिटीश व्यापारी एडवर्ड कोल्स्टन यांचा पुतळा उखडून समुद्रात फेकून देण्यात आला होता.

या घटनांची ब्रिटनमधील राजकीय वर्तुळासह विचारवंतांनी गंभीर दखल घेतली होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फेब्रुवारी महिन्यात आक्रमक व अतिडाव्या गटांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल यांनी ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ या आंदोलनाचा तसेच त्याला समर्थन देणार्‍या ब्रिटीश गटांवर टीकास्त्र सोडले होते. इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची भूमिका मान्य नसल्याचेही गृहमंत्री पटेल म्हणाल्या होत्या.

परराष्ट्रमंत्री ट्रुस यांनीही आपल्या वक्तव्यातून याचा पुनरुच्चार केल्याचे दिसते. ‘ब्रिटनच्या जनतेने आपल्या इतिहासाची लाज बाळगण्याची गरज नाही. भूतकाळातील घटनांवरून आता होणारे वाद ब्रिटनच्या शत्रूंनाच मदत करणारे ठरत आहेत. सतत आत्मनिरीक्षण करून अंगावर दोष घेण्याचा काळ संपला असून आता जागृत होण्याची गरज आहे’, अशा शब्दात ट्रुस यांनी दांभिक डाव्या विचारसरणीला लक्ष्य केले. ब्रिटनमध्ये अशा विचारसरणीकडून होणारे हल्ले तसेच सांस्कृतिक संघर्ष यांची अखेर व्हायला हवी, असेही परराष्ट्रमंत्री ट्रुस यांनी बजावले.

leave a reply