रशिया युक्रेनच्या खारकिव्हवर जबरदस्त कारवाईच्या तयारीत

मॉस्को – येत्या काही तासात रशिया युक्रेनच्या खारकिव्ह शहरावर जबरदस्त लष्करी कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खारकिव्हमधील भारतीयांनी जलदगतीने हे शहर सोडण्याचा संदेश दिला आहे. खारकिव्ह ताब्यात घेण्याबरोबरच रशिया युक्रेनची राजधानी किव्हबाबत महत्वाचा निर्णय घेईल, अशी चर्चा आहे. युक्रेनचे माजी राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांन रशियाने बेलारूसमध्ये आणले असून लवकरच ते युक्रेनचे अधिकृत राष्ट्राध्यक्ष असल्याची घोषणा रशियाकडून केली जाऊ शकते, असे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

खारकिव्हयुक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना पदावरून खाली खेचणे हे आपल्या युक्रेनवरील हल्ल्याचे ध्येय असल्याचे रशियाने याआधी स्पष्ट केले होते. ही रशियाची प्रमुख मागणी असल्याचा दावा केला जातो. यासाठी राजधानी किव्हचा ताबा घेऊ झेलेन्स्की यांच्या जागी यानुकोविच यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची रशियाची योजना आहे. एकदा का या देशाची सूत्रे पुन्हा एकदा यानुकोविच यांच्याकडे आली तर युक्रेन अमेरिक व पाश्‍चिमात्य देशांना अपेक्षित असलेल्या रशियाविरोधी भूमिकेपासून फारकत घेईल. यासाठी रशियाने रशियाने लष्करी सामर्थ्याचा वापर केल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

यानुकोविच यांना थेट युक्रेनमध्ये न आणता शेजारच्या बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये आणण्यात आले आहे. युक्रेनबरोबर रशिया करीत असलेल्या चर्चेत यानुकोविच यांनाही सहभागी करून घेण्याचा रशियाचा विचार असल्याचेही दावे केले जातात. पण अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही. मात्र राजधानी किव्हचा ताबा घेऊन युक्रेनला कायम आपल्या टाचेखाली ठेवण्याचा रशियाचा विचार नाही, हे रशियन नेते वारंवार सांगत आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये सत्ताबदल घडवून आणणे हेच रशियाच्या आक्रमणाचे उद्दिष्ट असल्याचे समोर येत आहे.

मात्र रशियाच्या या डावपेचांची पूर्ण कल्पना असलेल्या अमेरिका व नाटोच्या सदस्यदेशांनी युक्रेनमध्ये दुसर्‍या कुणीही नियुक्त केलेल्या नेत्याला मान्यता दिली जाणार नाही, असे आधीच जाहीर केले होते. त्यामुळे युक्रेनमध्ये अधिक जबरदस्त संघर्ष पेट घेईल व त्याचे पडसाद जगभरात उमटणार असल्याचे उघड होऊ लागले आहे. एकीकडे अमेरिका व नाटोचे सदस्यदेश रशियाविरोधी लष्करी कारवाईसाठी युक्रेनच्या लष्कराबरोबरच जनतेलाही उठाव करण्याची चिथावणी देत आहेत. याची पूर्वतयारी अमेरिक व युरोपिय देशांनी केल्याचे दावे विश्‍लेषक करीत आहेत. यासाठीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा अमेरिका प्रभावीपणे वापर करीत असून त्याना नायक म्हणून जगासमोर पेश करीत आहे. मात्र रशियाला हे युद्ध लांबविण्यात स्वारस्य नसून युक्रेनमध्ये सत्ताबदल घडवून आपले सुरक्षाविषयक हितसंबंध जपण्याला रशिया सर्वाधिक महत्त्व देत असल्याचे दिसते.

leave a reply