रशियाला बहिष्कृत करण्याच्या मुद्यावरुन जी20 सदस्य देशांमध्ये मतभेद

वॉशिंग्टन – युक्रेनच्या विरोधात युद्ध छेडणाऱ्या रशियाला ‘जी20′ संघटनेतून बहिष्कृत करा, अशी मागणी पाश्चिमात्य देश करीत आहेत. यासाठी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा व मित्रदेशांनी जी20च्या बैठकीचा सभात्याग करून इतर देशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण भारत, चीन, सौदी अरेबिया, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका आणि अन्य देशांना ही बाब मान्य नाही. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धावरुन जी20 संघटनेतच मतभेद निर्माण झाल्याचे उघड झाले आहे.

जी20अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे जी20 सदस्य देशांच्या अर्थमंत्र्यांची ‘फंड-आयएमएफ’ वार्षिक सभा सुरू आहे. यानिमित्ताने रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री ॲन्तोन सिलुआनोव्ह बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर पाश्चिमात्य मित्रदेशांनी सभात्याग सुरू केला. अमेरिकेच्या कोषागारमंत्री जेनेट यालेन यांनी रशियाविरोधात सभात्याग सुरू केल्यानंतर ब्रिटन, कॅनडाचे अर्थमंत्री देखील यात सहभागी झाले. कॅनडाच्या अर्थमंत्र्यांनी सभात्याग करणाऱ्या दहा देशांच्या अर्थमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला या निर्णयाचे समर्थन केले.

मात्र या बैठकीत सहभागी असलेल्या भारत, चीन, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इंडोनेशिया या देशांनी सभात्याग करण्याचे टाळले. या बैठकीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देखील सहभागी झाल्या होत्या. रशिया-युक्रेन युद्धावरुन भारताने तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. तर चीन, दक्षिण आफ्रिका या देशांनी युक्रेनमधील युद्धासाठी नाटोला जबाबदार धरले आहे. रशियासारख्या महत्त्वाच्या देशाला या संघटनेतून वगळता येणार नसल्याची भूमिका ब्राझिल, सौदी अरेबिया या देशांनी स्वीकारली आहे. त्यामुळे रशियाच्या मुद्यावरुन जी20 देशांमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे.

जी20जी20 देशांच्या राष्ट्रप्रमुखांची मुख्य बैठक येत्या नोव्हेंबर महिन्यात इंडोनेशियाच्या जकार्ता येथे होणार आहे. या बैठकीमध्ये रशियाला आमंत्रित करू नये, यासाठी पाश्चिमात्य देश इंडोनेशियावर दबाव टाकत आहेत. इंडोनेशियाने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना आमंत्रित केले तर आपण या बैठकीवर बहिष्कार टाकू, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली आहे.

याआधी 2014 साली रशियाने युक्रेनवर हल्ला चढवून क्रिमिआच्या भूभागाचा ताबा घेतला होता. त्यावेळी अमेरिका व युरोपिय देशांनी रशियाला जी-8 या औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांच्या संघटनेतून वगळले होते. त्यानंतर गेली सात वर्षे जी-7चे आयोजन केले जात आहे. त्याप्रमाणे अमेरिका व युरोपिय देश यावेळी देखील जी20 संघटनेतून रशियाला वगळण्याची योजना आखत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. पण युक्रेनच्या युद्धावरुन जी20 सदस्य देशांमध्ये असलेले मतभेद लक्षात घेता, या संघटनेतून रशियाचा बहिष्कार करणे तितकेसे सोपे नाही, जी20चे जी19 होऊ शकत नाही, असे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply