नायजेरियातील ऑईल रिफायनरीत झालेल्या स्फोटात शंभराहून अधिक जणांचा बळी

अबुजा – नायजेरियाच्या दक्षिण भागातील इमो स्टेटमध्ये इंधन शुद्धिकरण केंद्रात (ऑईल रिफायनरी) झालेल्या भीषण स्फोटात 100हून अधिक जणांचा बळी गेला आहे. हे केंद्र बेकायदेशीररित्या चालविण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या सहा महिन्यात नायजेरियातील इंधनप्रकल्पात स्फोट होण्याची ही दुसरी घटना ठरली आहे. नायजेरियाच्या विविध प्रांतांमध्ये अवैधरित्या चालविण्यात येणारे इंधन प्रकल्प बोकाळल्याचे समोर आले आहे. या घटनेवर राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बुहारी यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून सदर दुर्घटना राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.

ऑईल रिफायनरीतइमो प्र्रांतातील अबेझी भागात चालविण्यात येणाऱ्या बेकायदा ऑईल रिफायनरीत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यातून भडकलेल्या आगीची झळ या रिफायनरीपासून जवळ असलेल्या दोन डेपोंनाही लागली व आग अधिकच भडकली. या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्या. रिफायनरी व डेपोत नक्की किती लोक होते याची ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र 80हून अधिक जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. स्फोट व त्यानंतर लागलेल्या आगीची व्याप्ती मोठी असल्याने बळींची संख्या अधिक वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

ऑईल रिफायनरीइमो स्टेटच्या पोलीस प्रमुखांनी सदर दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रिफायनरी चालविणाऱ्या व्यक्तीला ‘वाँटेड गुन्हेगार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी ‘नायजेर डेल्टा’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या इंधनसंपन्न क्षेत्रात बेकायदा तेल उद्योगाविरोधात मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र त्यानंतरही ही घटना घडल्याने नायजेरिया सरकारच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

नायजेरिया हा आफ्रिकेतील सर्वाधिक इंधनसंपन्न देश म्हणून ओळखण्यात येतो. नायजेरियात प्रतिदिनी 20 लाख बॅरल्सहून अधिक कच्च्या तेलाचे उत्पादन होते. मात्र त्यातील 10 टक्के इंधनाची चोरी होते. देशातील बेकारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हजारो जण या इंधन चोरीत तसेच त्यातून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या अवैध निर्मितीत सहभागी झाले आहेत. हा अवैध उद्योग रोखण्याचे बहुतांश प्रयत्न अपयशी ठरले आहेत सरकारी नियम व कर चुकविण्याच्या उद्देशाने काही स्थानिक कंपन्याही बेकायदा उद्योगाला बळ देत असल्याचे मानले जाते.

leave a reply