भारताच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या चीनच्या नागरिकांचा व्हिसा रोखण्याचा भारताचा निर्णय

नवी दिल्ली – चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्रेक झाल्यानंतर, या देशात शिक्षण घेत असलेले 22 हजार भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले होते. या विद्यार्थ्यांना पुन्हा चीनमध्ये प्रवेश देऊन त्यांचे शिक्षण सुरू करण्यास चीन तयार नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. भारताने वारंवार चीनबरोबरील चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला चीन दाद देत नाही, हे पाहून भारताने चीनमधून भारतात येणाऱ्यांचा व्हिसा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ राजनैतिक तसेच व्यापारी कारणासाठी भारतात येणाऱ्या चिनी नागरिकांनाच यापुढे भारताचा व्हिसा मिळेल.

व्हिसाआकसापोटी चीन भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशात प्रवेश नाकारत आहे. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी चीनच्या दूतावासासमोर निदर्शने करून आपला असंतोष व्यक्त केला होता. पण चीनने त्याकडे लक्ष दिलेले नाही. उलट इतर काही देशांच्या विद्यार्थ्यांना परवानगी देऊन, चीनने भारतीय विद्यार्थ्यांच्या संतापात भर टाकली आहे. भारताच्या सरकारने वारंवार चीनकडे हा मुद्दा उपस्थित केला. तरीही चीनने त्याला दाद दिली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चिनी नागरिकांना भारताचा व्हिसा नाकारण्याचा निर्णयघेतल्याचे दिसते.

यापुढे केवळ राजनैतिक तसेच व्यावसायिक कारणांसाठीच चिनी नागरिकांना भारताचा व्हिसा मिळेल. इतर कारणांसाठी चीनचे नागरिक भारतात येऊ शकणार नाही. भारतीय विद्यार्थ्यांबाबत चीनने घेतलेल्या निर्णयाचे दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होत असल्याची जाणीव याद्वारे भारताने चीनला करून दिली आहे. काही आठवड्यांपूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी भारताला भेट दिली होती. सीमावादाचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होऊ नये, अशी आदर्शवादी अपेक्षा व्यक्त करून चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपला देश भारताबरोबरील संबंध सुधारण्यास तयार असल्याचा दावा केला होता. पण भारतीय विद्यार्थ्यांबाबत चीनने घेतलेला निर्णय, परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे दाखवून देत आहे.

द्विपक्षीय सहकार्याबाबत कितीही मोठे दावे केले, तरी चीन आपली भारतद्वेषी धोरणे बदलण्यास तयार नाही, असे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत. यामुळे चीनवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही, हा भारताचा समज अधिकच दृढ होईल. भारताकडून व्यापारी लाभ उकळू पाहणाऱ्या चीनला पुढच्या काळात याचे परिणाम सहन करावे लागतील. पुढच्या काळात भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी चीनचा पर्याय निवडण्याचा धोका पत्करणार नाहीत. ही जोखीम पत्करून चीन भारतीय विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यास तयार झाल्याचे दिसते आहे.

leave a reply