जम्मू-काश्मीरचे फुटीर नेते गिलानी यांनी ‘हुरियत’ सोडली

श्रीनगर – जम्मू-काश्मीरचे फुटीर नेते सय्यद अली शहा गिलानी यांनी ‘हुरियत कॉन्फरन्स’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर खोऱ्यात फुटीर कारवाया करणाऱ्या ‘हुरियत’चे नेते गिलानी यांनी हा राजीनामा पाकिस्तानच्याच दबावाखाली दिल्याचे सांगण्यात येते. काश्मीरमधून केंद्र सरकारने कलम ३७० हटविल्यानंतर ‘हुरियत’कडून हिंसक आंदोलने, दहशतवादी हल्ले होतील. यामुळे भारतावर दडपण वाढवता येईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे भांडवल करता येईल, अशी पाकिस्तानला अपेक्षा होती मात्र जम्मू-काश्मीरमध्ये तसे काहीच घडले नाही. यामुळे ‘आयएसआय’ गिलानी यांच्यावर नाराज होती, असे सांगितले जाते. तसेच गिलानी यांचा राजीनामा म्हणजे काश्मीरमध्ये फुटीरांचे अस्तित्व आता संपुष्टात येत असल्याचे संकेत ठरतात, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

गिलानी

जम्मू-काश्मीरमधील सर्व फुटीर संघटनांची संयुक्त संघटना असलेल्या ‘हुरियत कॉन्फरन्स’चे अध्यक्षपद गिलानी यांच्याकडे होते. काश्मीरमधील फुटीरांचा जहाल चेहरा म्हणून गिलानी यांना ओळख होती. सोमवारी एका ऑडिओ मेसेजद्वारे गिलानी दोन वाक्यात आपला राजीनामा दिला. सध्याची परिस्थिती पाहता आपण हा राजीनामा देत आहोत. आपला आता ‘हुरियत’शी कोणताही संबंध उरला नसल्याचे गिलानी यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक आणि आपल्या कार्यकाळात दहशतवाद्यांचे कर्दनकाळ मानले जाणारे एस.पी.वैद्य यांनी गिलानी यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. फुटीरतावाद्यांचा सरदार, दहशतवाद्यांचा उत्तेजन देणारा आणि ‘आयएसआय’चा हस्तक असे वैद्य यांनी गिलानी यांचे वर्णन केले आहे. तसेच त्यानंतर ‘सब कुछ लूटा कर होश मे आये तो क्या हुआ… ‘ असा शेरा वैद्य यांनी मारला आहे.

काश्मीर खोऱ्यात फुटीर कारवायांना लगाम बसला असून येथील फुटीरांचे अस्तित्व आता संपुष्टात येत आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. कित्येक फुटीर नेते ‘टेरर फंडिंग’ प्रकरणात कारागृहात आहेत. तसेच याच प्रकरणात काही फुटीर नेत्यांची संपत्ती जप्त झाली आहे. गिलानी यांच्या सकट कित्येक फुटीर नेत्यांना पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर येणार पैसा येतो. यातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जमवाल्याचे याआधी उघड झाले होते. तसेच काश्मिरी तरुणांना दहशतवादासाठी भडकावणाऱ्या, त्यांच्या हाती बंदुका आणि दगड देणाऱ्या फुटीरांची मुले परदेशात आरामात राहतात. ही बाब उघड झाल्यावर गेल्या पाच ते सहा वर्षात फुटीरांना काही भागात मिळणार पाठिंबाही कमी झाला होता.

यामध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यावर आणि त्यानंतर येथील रहिवाशी कायद्यात केंद्र सरकारने बदल केल्यावर ‘हुरियत कॉन्फरन्स’ काश्मीरमध्ये हिंसाचार माजवू शकली नाही, यामुळे पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ नाराज असल्याने गिलानीना हुरियत सोडावी लागली, असे सांगितले जाते.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या सुरक्षादलाच्या कारवाईत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर मसूद याला ठार करण्यात आले . मसूद ठार झाल्याने डोडा जिल्हा दशतवाद्यांपासून मुक्त झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच या चकमकीत लश्कर-ए-तोयबाच्या आणखी दोन दहशतवाद्यांना देखील ठार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

leave a reply