‘गिलगिट-बाल्टिस्तान’च्या जनतेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ‘चालते व्हा’ म्हणून खडसावले

स्कार्दू – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाच दिवसांपूर्वी गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानचा पाचवा प्रांत घोषित केले. भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी इम्रान खान यांनी ही खेळी खेळल्याचा दावा पाकिस्तानी विश्लेषकांनी केला होता. पण अवघ्या काही मिनिटातच इम्रान खान यांची ही खेळी त्यांच्यावरच उलटली आहे. गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानचा पाचवा प्रांत बनविण्याच्या इम्रान यांच्या घोषणेचा स्थानिकांनी कडक शब्दात निषेध केला आहे. त्याचबरोबर येथील स्थानिकांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना त्यांच्या तोंडावरच ‘गेट आऊट’ असे हिणविल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान यांना प्रचंड नामुष्कीला सामोरे जावे लागल्याची चर्चा पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरू आहे.

भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या आठवड्यात गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानचा प्रोव्हिजनल प्रोव्हिन्स अर्थात अंतरीम प्रांत म्हणून जाहीर केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या काश्मीरबाबतच्या कराराचा भंग न करता ही तरतूद केल्याचे इम्रान खान यांनी म्हटले होते. गिलगिट-बाल्टिस्तान तसेच पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील जनतेचा विरोध डावलून इम्रान खान यांनी ही घोषणा केली होती. पाकिस्तानी पंतप्रधानांचा हा निर्णय म्हणजे गिलगिट-बाल्टिस्तानची यथास्थिती बदलण्याचा प्रयत्‍न असल्याची टीका झाली होती. तसेच स्थानिकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केल्याचा दावा करण्यात आला होता.

पण इम्रान यांच्या या गिलगिट-बाल्टिस्तान दौर्‍याचा ताजा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामध्ये गिलगिट-बाल्टिस्तानची जनता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरसाठी नियुक्त केलेले नेते अली अमिन गुंडापूरी यांना घेरून उभी असल्याचे यात दिसत आहे. ‘आमच्या भूभागातील पाकिस्तानची दखलंदाजी अजिबात खपवून घेणार नाही. आमच्या भूभागातून चालते व्हा’, असे या जनतेने पाकिस्तानी पंतप्रधानांना त्यांच्या तोंडावर सुनावले. पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानचा इम्रान सरकार अवैधरित्या कब्जा मिळवित असल्याचा आरोप स्थानिक तसेच मानवाधिकार अधिकार्‍यांनी केला आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांना गिलगिट-बाल्टिस्तानमधील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर इम्रान सरकारवरील विरोधक व माध्यमांचे हल्ले वाढले आहेत. तर गिलगिट-बाल्टिस्तानच्या जनतेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना नाकारल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे.

leave a reply