पारदीपमध्ये ‘सागर कवच’ सराव संपन्न

भुवनेश्वर – नौदल आणि तटरक्षक दलासह ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या विविध विभागांचा समावेश असलेला “सागर कवच” ह्या सरावाची शुक्रवारी सांगता झाली. सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही राज्यांमध्ये अशा सरावाचे आयोजन केले जाते.

२६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर सागरी सीमेच्या संरक्षणाच्या दृष्टीने किनारपट्टीच्या राज्यांमध्ये विविध पावले उचलण्यात आली. यापार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारनेही किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी विविध उपाय हाती घेतले. किनारपट्टीच्या सुरक्षेशी संबंधित विविध विभागांमध्ये समन्वय वाढावा यासाठी संयुक्त सरावाची परंपरा सुरु करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सराव पार पडला. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सरावाला “सागर कवच” नाव देण्यात आले होते.

पारदीप बंदर क्षेत्रात या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय नौदल, तटरक्षक दल, पश्चिम बंगाल व ओडिशा पोलीस, स्थानिक मच्छीमार, वनविभाग आणि बंदर सागरी विभागासह सागरी सीमेशी संबंधित दहापेक्षा अधिक विभाग या संयुक्त सरावात सहभागी झाले होते. घुसखोरी आणि हल्ले रोखण्याचा सराव यावेळी करण्यात आला.

leave a reply