युरोपच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘शेन्गेन करारा’ ची पुनर्रचना करा

- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची मागणी

पॅरिस – फ्रान्स व ऑस्ट्रियामध्ये एकापाठोपाठ झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, युरोपच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘शेन्गेन’ कराराची पुनर्रचना करण्याची आग्रही मागणी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केली आहे. फ्रान्सच्या नीसमध्ये हल्ला करणारा दहशतवादी इटलीतून फ्रान्समध्ये आला होता. तर ऑस्ट्रियातील दहशतवाद्याने स्लोव्हाकियात जाऊन शस्त्रे मिळविली होती, अशी माहिती समोर आली आहे. युरोपमध्ये ‘शेन्गेन’ योजनेमुळे एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास सहज शक्य असल्याने, दहशतवादी सहजगत्या हल्ले चढवू शकल्याचे यातून दिसून येते. त्यामुळे फ्रेंच राष्ट्राध्यक्षांकडून करण्यात मागणी लक्षवेधी ठरते.

युरोपात गेल्या दोन महिन्यात पाच दहशतवादी हल्ले झाले असून त्यात फ्रान्समधील चार व ऑस्ट्रियातील एका हल्ल्याचा समावेश आहे. हल्ला करणारे दहशतवादी निर्वासित असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षात युरोपात झालेल्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांमध्येही निर्वासितांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. युरोपात घुसखोरी करणारे निर्वासित व त्यांच्या आडून प्रवेश करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सीमेवरील सुरक्षा मजबूत करण्याची मागणी सातत्याने होत आहे. यात युरोपिय महासंघाचा पाया समजण्यात येणारी ‘शेन्गेन’ योजना बंद करण्याच्या मागणीचाही समावेश आहे. मात्र जर्मनीसह काही प्रमुख देशांनी त्याला विरोध केला होता.

फ्रान्स व ऑस्ट्रियामध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर परिस्थिती बदलू लागल्याचे फ़्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या मागणीवरून दिसून येते. ‘शेन्गेन योजनेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. संपूर्ण यंत्रणेत बदल घडवून युरोपच्या सीमेवरील सुरक्षा अधिक मजबूत करणे महत्त्वाचे आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या महासंघाच्या बैठकीत फ्रान्स यासाठी प्रस्ताव मांडेल’,असे मॅक्रॉन यांनी सांगितले. युरोपच्या बाह्य सीमांवर सुरक्षेसाठी प्रभावी ‘सिक्युरिटी पोलीस फोर्स’ तैनात करण्याची गरज आहे, असेही फ्रेंच राष्ट्राध्यक्ष म्हणाले. यावेळी मॅक्रॉन यांनी फ्रान्स आपल्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांची संख्या दुपटीने वाढवित असल्याचीही माहिती दिली. फ्रान्सच्या सीमेवर सध्या २,४०० जवान तैनात असून त्यात ४,८०० पर्यंत वाढ करण्यात येईल, असे मॅक्रॉन यांनी सांगितले. फ्रान्सने काही दिवसांपूर्वीच देशाच्या विविध भागात तैनात लष्करी जवानांची संख्याही सात हजारांवर नेण्याचे संकेत दिले होते.

‘कट्टरपंथीयांच्या दहशतवादाचा मुकाबला करताना, सीमेवरून निर्वासितांची तस्करी करणाऱ्यांच्या नेटवर्कविरोधातही संघर्ष करावा लागेल. या नेटवर्कचे दहशतवाद व दहशतवाद्यांशीही संबंध आहेत’, याकडे फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले. फ्रान्सने गेल्या काही दिवसात कट्टरपंथीयांविरोधात व्यापक कारवाई चालू केली असून अनेक गटांची चौकशी सुरू केली आहे. काही संशयितांना अटक करण्यात आली असून, २०० हून अधिक परदेशी नागरिकांची हकालपट्टी करण्याचीही घोषणा केली आहे.

२०१५ सालापासून युरोपात मोठ्या प्रमाणात निर्वासितांचे लोंढे घुसत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यात युरोपिय देशाना सपशेल अपयश आले आहे. या अपयशाचे फार मोठे सामाजिक व राजकीय परिणाम युरोपिय देशांमध्ये दिसून आले आहेत. काही महिन्यांपूर्वीच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी, युरोपच्या सीमेवर कोट्यवधी निर्वासित धडकतील, अशी धमकीही दिली होती.

leave a reply