कोरोनाची साथ आणि आर्थिक संकट असतानाही जागतिक संरक्षणखर्च 2.1 ट्रिलियन डॉलर्सच्या विक्रमी स्तरावर

स्टॉकहोम – 2021 सालात जागतिक पातळीवरील संरक्षणावर केला जाणारा एकूण खर्च 2.1 ट्रिलियन डॉलर्स इतक्या विक्रमी स्तरावर गेला आहे. कोरोनाच्या साथीमुळे खड्या ठाकलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देखील संरक्षणखर्चात होत असलेली ही वाढ लक्षणीयठरते. या 2.1 ट्रिलियन डॉलर्सच्याखर्चात अमेरिका, चीन, भारत, ब्रिटन आणि रशिया या पाच देशांचा हिस्सा 62 टक्के इतका आहे. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूट-सिप्री’ या स्वीडनमधील अभ्यासगटाने ही माहिती उघड केली.

कोरोनाच्या साथीचे भयंकर परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरझाले होते. सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना याचा फटका बसला होता. असे असतानाही, 2021 सालात संरक्षणावरील खर्च कमी होण्याच्या ऐवजी विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. जागतिक पातळीवर संरक्षणासाठी केला जाणारा खर्च 2021 सालात 2.1 ट्रिलियन डॉलर्सवर गेल्याचे सिप्रीने आपल्या अहवालात म्हटले आहे. युक्रेनचे युद्ध छेडणाऱ्या रशियाच्या संरक्षणखर्चात झालेली वाढ लक्षणीय ठरते. पण 2014 सालापासून 2021 सालापर्यंत रशिया आपल्या संरक्षणखर्चात सातत्याने वाढ करीत आहे, याकडे सिप्रीने लक्ष वेधले.

2014 साली रशियाने युक्रेनच्या क्रिमिआचा ताबा घेतला होता. तेव्हापासून रशियाने संरक्षणखर्चात दरवर्षी मोठी वाढ करण्याचे सत्र सुरू केले होते, याकडे सिप्रीने लक्ष वेधले. तर एका दशकापासून अमेरिकेचा संरक्षणक्षेत्रातील संशोधन व प्रगत तंत्रज्ञान यावरील खर्च तब्बल 24 टक्क्यांनी वाढलेला आहे. संरक्षणविषयक तंत्रज्ञान व संशोधनात आपण प्रतिस्पर्धी देशांच्या पुढे राहण्यासाठी अमेरिका ही प्रचंड गुंतवणूक करीत आहे. असे असले तरी शस्त्रास्त्रांवरचा अमेरिकेचा खर्च 6.4 टक्क्यांनी कमी झालेला आहे, याची नोंद सदर अहवालात आहे. याचे कारण शस्त्रास्त्रांपेक्षाही अमेरिका अतिप्रगत तंत्रज्ञानावर अधिक गुंतवणूक करीत आहे, याची जाणीव सिप्रीचा अहवाल करून देत आहे.

अमेरिकेतील संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनचा संरक्षणखर्च 293 अब्ज डॉलर्सवर गेला आहे. सलग 27 वर्षांपासून चीन योजनाबद्धरित्या संरक्षणावरील खर्च वाढवित आहे. चीनबरोबरील तणाव आणि चीनपासून संभवणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, शेजारी देशांना विशेषतः जपान व ऑस्ट्रेलियालाही आपल्या संरक्षणखर्चात वाढ करावी लागल्याची नोंद सिप्रीने केली.

तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा संरक्षणखर्च 76.6 अब्ज डॉलर्सवर गेला आहे. 2021 साली त्यात 0.9 टक्क्यांची वाढ झाल्याचे सिप्रीचे म्हणणे आहे. तर ब्रिटनच्या संरक्षणखर्चात तीन टक्क्यांची वाढ होऊन 2021 सालात ब्रिटनचा संरक्षणखर्च 68.4 अब्ज डॉलर्सवर गेला. या वाढीमुळे ब्रिटनने या यादीत पाचव्या स्थानावर असलेल्या सौदी अरेबियाला मागे टाकल्याचे सिप्रीने म्हटले आहे.

leave a reply