युक्रेनवर अणुहल्ला झाल्यास रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना जबर किंमत मोजणे भाग पडेल

- अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकारी व्हिक्टोरिआ नुलँड यांचा इशारा

वॉशिंग्टन/मॉस्केो – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर अणुहल्याचे आदेश दिले तर रशिया व पुतिन यांनाही त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकारी व्हिक्टोरिआ नुलँड यांनी दिला. युक्रेनच्या नेत्यांकडून वारंवार रशिया अणुहल्ला चढविल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नुलँड यांनी हा इशारा दिला.

गेल्याच आठवड्यात रशियाने ‘सरमात’ या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. आपले हे क्षेपणास्त्र जगातील अतिप्रगत सुरक्षायंत्रणांवर मात करील, असा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी चाचणीनंतर केला होता. रशियन अंतराळ संस्था ‘रॉसकॉसमॉस’चे संचालक दिमित्रि रोगोझिन यांनी ही चाचणी नाटो व युक्रेनमधील नाझीवादींसाठी इशारा असल्याचे रोगोझिन बजावले होते. या चाचणीनंतर रशियाच्या युक्रेनवरील अण्वस्त्रहल्ल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनमधील लष्करी मोहिमेला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच आपल्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना अलर्टचा इशारा दिला होता. पुतिन यांच्या या इशाऱ्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली होती. या इशाऱ्यानंतर रशियाने अणुयुद्धाची शक्यता नाकारली, तरी युक्रेनसह पाश्चिमात्य देश सातत्याने त्याचा उल्लेख करीत आहेत. पुतिन यांना युक्रेनमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने ते अणुहल्ला चढवतील, असे पाश्चिमात्य देशांकडून बजावण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकारी नुलँड यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. युक्रेनमधील ‘युरोपियन प्रावदा’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नुलँड यांनी रशियाच्या युक्रेनवरील संभाव्य अणुहल्ल्यावर प्रतिक्रिया नोंदविली. रशियाने युक्रेनमध्ये घडविलेले युद्धगुन्हे लक्षात घेतले तर अणुहल्ल्ल्याचा भयंकर निर्णय पुतिन घेेऊ शकतात, असा दावा नुलँड यांनी केला.

मात्र रशियाने अण्वस्त्रांचा वापर केल्यास परिस्थिती पूर्णपणे बदलेल व अशा बदलत्या परिस्थितीत रशियासह पुतिन यांना वैयक्तिक पातळीवर भयावह किंमत मोजणे भाग पडेल, असा इशारा व्हिक्टोरिआ नुलँड यांनी दिला. त्याचवेळी युद्धादरम्यान कितीही वाईट स्थिती निर्माण झाली तरी अमेरिकेसह पाश्चिमात्य देश युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असे आश्वासनही नुलँड यांनी दिले आहेत.

leave a reply