पाकिस्तानच्या अपप्रचाराला भारताचे प्रत्युत्तर

संयुक्त राष्ट्रसंघ – पाकिस्तान अजूनही पूराच्या गाळात असताना या देशाचे पंतप्रधान मात्र संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात भारताच्या विरोधात गरळ ओकण्यात धन्यता मानत आहेत. त्यावर भारताने जबरदस्त प्रतिक्रिया नोंदविली. आपल्या देशातील अल्पसंख्यांकांवर भीषण अत्याचार करणारा पाकिस्तान आपल्या अपराधांकडून जगाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भारतावर दोषारोप करीत आहे, असा ठपका संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे फर्स्ट सेक्रेटरी मिजिटो विनिटो यांनी ठेवला. तसेच भारताबरोबर चांगले संबंध हवे असल्याचे दावे ठोकणारा हा देश याबाबत गंभीर असताना तर त्याने 26/11च्या सूत्रधारांना आश्रय दिला नसता, असा सणसणीत टोला विनिटो यांनी लगावला.

अपेक्षेनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात काश्मीरचे तुणतुणे वाजविले. त्याचवेळी भारताबरोबर आपल्या देशाला चांगले संबंध हवे असल्याची आदर्शवादी भूमिकाही घेतली. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसला, तरी भारताने आपल्यावरील पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या टीकेला तिथल्या तिथेच उत्तर दिले. राईट टू रिप्लाय चा वापर करून भारताच्या राजनैतिक पथकातील फर्स्ट सेक्रेटरी मिजिटो विनिटो यांनी शरीफ यांच्या आक्षेपांना जबरदस्त प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर आरोप करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा गैरवापर केला. याद्वारे त्यांनी आपल्या देशाकडून केले जाणारे गुन्हे लपविण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे विनिटो म्हणाले.

पाकिस्तान सीमेपलिकडे दहशतवाद पुरस्कृत करणारा देश असून या देशाने मुंबईत 26/11चा हल्ला घडविणाऱ्या सूत्रधारांना आजवर पाठिशी घातले होते. पाकिस्तान खरोखरच भारताबरोबर उत्तम संबंध ठेवण्यासाठी उत्सुक असता तर या देशाने भारतात दहशतवादी हल्ले घडविणाऱ्यांना अशारितीने पाठिशी घातले नसते, ही बाब विनिटो यांनी लक्षात आणून दिली. तसेच काश्मीरच्या बाबत बोलताना विनिटो यांनी पाकिस्ताननेच अवैधरित्या काश्मीरचा भूभाग आपल्या ताब्यात ठेवलेला आहे, याची आठवण करून दिली. हा भूभाग भारताचा अजून त्यावर भारताचा सार्वभौम अधिकार असल्याचे विनिटो यांनी ठासून सांगितले.

leave a reply