देशात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊनमुळे सोन्याची प्रत्यक्ष मागणी सध्या प्रचंड प्रमाणात घटलेली असली, तरी देशात सोन्याच्या दराने विक्रमी उंची गाठली आहे. सोन्याचे दर ४८ हजार प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचले आहेत. सोमवारी सकाळी सोन्याच्या दारात ८८१ रुपयांची उसळी दिसून आली. ९ एप्रिलपासून सोन्याचे दर २,७२८ रुपयाने वाढले आहेत. यावर्षात आतापर्यंत सोन्याच्या किंमती १६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पुढील वर्षभरात सोन्याच्या किंमती ५२ हजार रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचतील, असा अंदाज विश्लेषकांनी वर्तविला आहे. देशात सोन्याच्या किंमतीत सध्या दिसून येत असलेल्या तेजीमागे निरनिराळी कारणे असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

सोमवारी देशात शुद्ध सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे ४७,९२९ पर्यंत पोहोचले. शुक्रवारी सोन्याच्या घाऊक बाजारात सोन्याचे दर ४७,०६७ रुपये इतके होते. सुमारे महिनाभराआधी ९ एप्रिल रोजी हेच दर ४५,२०१ इतके होते. तर १३ एप्रिल रोजी हे दर ४६,५२३ या विक्रमी पातळीवर पोहोचले. त्यानंतर १६ एप्रिल रोजी सोन्याच्या दराने ४६,९२८ प्रति १० ग्रॅम हा नवा उच्चांक प्रस्थपित केला. पण या विक्रमी पातळीवर पोहोचल्यावर सुमारे महिनाभर सोन्याच्या दरातला चढउतार याचपातळीच्या आजूबाजूलाच होत होता. मात्र शुक्रवारी १५ एप्रिल रोजी सोन्याच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला, तर सोमवारी बाजार पुन्हा उघडताच सोन्याच्या दराने नवी विक्रमी उंची गाठली.

कोरोनाव्हायरसमुळे देशात २४ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यामुळे देशात सोन्याची प्रत्यक्ष मागणी शुन्यवत झाली आहे. मात्र लॉकडाउनच्या या ५० दिवसात भौतिक मागणी घटूनही सोन्याचे दर खाली आलेले नाहीत. यामागे वेगवेगळी कारणे असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. सोन्याची मागणी घटली असली, तरी कोरोनाव्हायरसमुळे निर्माण झालेल्या अस्थिर आर्थिक परिस्थितीत शेअर बाजार कोसळत असताना गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळविला आहे. सध्याच्या स्थितीत शाश्वत गुंतवणूक म्हणून सोन्यात आणि गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक होत आहे.

जगातिक बाजारातही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कित्यके देशांनी सोन्यामधील आपली गुंतवणूक वाढविल्याचे उघड झाले आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध संपलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे व्यापारी संबंध अधिक ताणले जाणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच कोरोनावर लस सापडल्याशिवाय अमेरिकन अर्थव्यवस्था लगेच उभारी घेईल याची शक्यता नाही. त्यातच जगातिक महामंदीच्या शक्यता विश्लेषक वर्तवत आहेत. यामुळेही गुंतवणूकदार सोन्याच्या गुंवणूकीवर अधिक विश्वास दाखवत आहे.

याशिवाय जगभरात लॉकडाऊनच्या स्थितीमुळे सोन्याचे उत्खननही विक्रमी पातळीवर घसरले असून पुरवठा कमी झाला आहे.’ वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’नुसार उत्खनन २०१५ च्या निच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. याचा परिणामही सोन्याच्या किमतीवर झाला आहे.

सध्या देशात सरकार आणि आरबीआयने रोखता वाढविण्यासाठी निरनिराळे उपाय हाती घेतले आहेत. बाजारात रोखता वाढणे ही सोन्यासाठी नेहमीच सकारात्मक बाब ठरते, याकडेही विश्लेषक लक्ष वेधत आहेत. त्याचबरोबर भारत हा सोन्याचा प्रमुख आयातदार देश आहे. मात्र सध्याच्या घडीला भारतीय चलनाची किंमत डॉलर्सच्या तुलनेत घसरली आहे. सोमवारी भारतीय रुपयाचा विनिमय दर ३३ पैशाने घसरून एका डॉलरला ७५.९१ रुपयापर्यंत खाली आला आहे. चलनाच्या विनिमय दारात कोणत्याही बदलाचा परिणाम लगेच सोन्याच्या किंमतीवर दिसून येतो, याकडेही विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply